शिवसेनेने बंद पाडली शाळेतील बेकायदा पुस्तक विक्री; गटशिक्षण अधिकाऱ्यांनी केली कारवाईसेंट अनिस पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिकांनी केले कबूल; लेखी आश्वासन
सेंट अनिस पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिकांनी केले कबूल; लेखी आश्वासन
Patr-2
वरोरा, दि. ४ मार्च: शहरातील सेंट अनिस पब्लिक स्कूल (CBSE) मध्ये पालकांना शाळेतूनच शालेय पाठ्यपुस्तके खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तत्परतेमुळे ही बेकायदेशीर विक्री उघडकीस आली असून, गटशिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेवर कारवाई करत पुस्तक विक्री बंद केली आहे.
पालकांवर सक्ती; व्हाट्सअप ग्रुपचा वापर:
मागील अनेक दिवसांपासून सेंट अनिस पब्लिक स्कूलच्या व लगतच्या सेंट अनिस शाळेतून पालकांना शाळेच्या आवारातूनच पुस्तके विकत घेणे बंधनकारक केले जात होते. यासाठी शाळेने व्हाट्सअप ग्रुप मार्फत पालकांना संदेश पाठवून संपूर्ण पुस्तक संच शाळेतूनच घेण्याची सूचना केली होती. ही बाब यापूर्वीच शिवसेनेने निवेदनामार्फत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, शाळेने आपली मुजोरी सोडली नव्हती. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने चार तारखेला धडक कारवाई करण्यात आली. दि. ५ मार्चपासून शाळा सुरू होत असल्याने पालकांसमोर पुस्तके घेणे बंधनकारक ठरले होते.
दि. ४ मार्च रोजी इयत्ता आठवी व नववीचा निकाल लागताच, शाळेने पालकांना शाळेत बोलावून घेतले आणि त्याचबरोबर पुस्तक विक्रीचा घाट आखला. यावेळी शाळेच्या आवारात 'अरुण बुक स्टोअर, नागपूर' यांच्या नावाने एनसीआरटी व एरो प्रकाशनाची पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.
शिवसेना पदाधिकाऱ्यांची दमदार कामगिरी:
ही माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक तथा नगरपरिषदचे बांधकाम सभापती मनीष जेठानी, माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक पंकज नाशिककर आणि माजी तालुकाप्रमुख तथा सरपंच नंदलाल टेंमुर्डे यांनी तात्काळ शाळेत धाव घेतली. त्यांनी पालकांना सक्तीच्या पुस्तक विक्रीपासून दिलासा देत हा प्रकार त्वरित बंद पाडला. याशिवाय, त्यांनी वरोरा येथील गटशिक्षण अधिकारी शुभांगी पिजदूरकर यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून शाळेत तपासणीसाठी टीम बोलावून घेतली
शिक्षण विभागाची कारवाई:
गटशिक्षण अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाळेच्या वर्ग क्र. Std XC मध्ये पुस्तक विक्री किंमत १३१४ रुपये विद्यार्थ्यांकडून घेत असल्याचे पत्रक मिळाले . या व्यतिरिक्त आयडी कार्ड १०० रुपये, डायरी १०० रुपये, रिपोर्ट कार्ड १०६ वेगळे होते. शाळेकडे या विक्रीसाठी आवश्यक अशी कोणतीही परवानगी नव्हती. गटशिक्षण अधिकारी शुभांगी पिजदूरकर यांनी घटनेची गंभीर दखल घेत शाळेच्या मुख्याध्यापिकांकडे खुलासा मागितला.
मुख्याध्यापिकांनी केले कबूल; लेखी आश्वासन:
चौकशीदरम्यान मुख्याध्यापिकांनी चूक कबूल करत शाळेतून पुस्तक विक्री सुरू असल्याचे मान्य केले. मात्र, यापुढे शाळेतून कोणतीही पुस्तक विक्री केली जाणार नाही, असे लेखी आश्वासन त्यांनी शिक्षण विभागाला दिले. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेवर कारवाई करत हा संपूर्ण अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येईल, असे स्पष्ट केले.
🗣️ प्रतिक्रिया
शुभांगी पिजदूरकर, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती वरोरा यांनी सांगितले:
"सेंट अनिस पब्लिक स्कूलची चौकशी केली असता, शाळेतून पुस्तक विक्री सुरू असल्याचे आढळून आले. ही विक्री आम्ही त्वरित बंद केली. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी चूक मान्य करत यापुढे शाळेतून पुस्तक विक्री करणार नसल्याचे लेखी लिहून दिले आहे. आम्ही त्यांच्यावर कारवाई केली असून, वरिष्ठांना तसा अहवाल पाठवणार आहोत."
मनीष जेठानी, जिल्हा संघटक व बांधकाम सभापती म्हणाले:
"शाळेत पुस्तक विक्रीची सक्ती करणे हा पालकांवरील अन्याय आहे. याबाबत शिक्षण विभागाने केलेली कारवाई योग्य आहे. पालकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील." यानंतर वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन शाळेतील पुस्तक विक्री बंद करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पंकज नाशिककर, माजी उपजिल्हाप्रमुख म्हणाले:
"शाळेच्या व्यावसायिकीकरणाला आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे. यामुळे इतर शाळांनाही चांगला संदेश जाईल. पालकांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." याचप्रमाणे अवैध कोचिंग क्लासेस जे दुसऱ्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची ऍडमिशन दाखवून लाखो रुपयाची फी वसूल करत आहे अशा अकॅडमी वर सुद्धा शिक्षण विभागाने कारवाई केली पाहिजे. यासाठी सुद्धा लढा शिवसेनेतर्फे उभारण्यात येणार आहे.
📢 पालकांमध्ये समाधान; पुस्तकवाटपात गोंधळ:
शिक्षण विभागाने केलेल्या कारवाईमुळे पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, शाळेने अचानक पुस्तक विक्री बंद केल्याने अनेक पालकांच्या मुलांना पुस्तके मिळू शकलेली नाहीत. उद्यापासून शाळा सुरू होत असल्याने या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या प्रकरणी पुढील कारवाईसाठी शिक्षण विभागाने दक्षता घेतली असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी निर्देश दिले आहेत.
*****
Comments
Post a Comment