वरोरा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीत कामगाराचा मृत्यू

वरोरा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीत कामगाराचा मृत्यू

शेगाव, १५ जानेवारी : वरोरा तालुक्यातील शेगाव परिसरात मशाचा पाट या ठिकाणाहून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करत असताना एका तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शेगाव पोलीस स्टेशनने या घटनेवर गुन्हा नोंदविला आहे.

बुधवारी रात्री १२.०० वा. च्या दरम्यान  वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर त्यांचा पाठलाग सुरू झाला होता . एक ट्रॅक्टर वेगाने पळ काढत असताना खड्डा आल्याने थांबवण्यात आले. त्याचवेळी ट्रॅक्टरचे वजन कमी करण्यासाठी त्याची हायड्रोलिक ट्रॉली वर केली गेली, ज्यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसलेला ३५ वर्षीय कामगार प्रवीण वसंत दडमल (निवासी: चारगाव बु.) खाली पडला आणि त्यावर वाळूचा ढीग कोसळल्याने त्याचा  मृत्यू झाला.
इतर कामगार घटनास्थळावरून पळून गेले. तपासी अधिकारी पीएसआय कांबळे यांनी जागेचा पंचनामा केला आणि बीएनएस कलम १०६(१) अन्वये शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे शेगाव परिसरातील अवैध वाळू तस्करीचे व्यापक जाळे उघडकीस आले आहे. पोलीस व वनविभाग यांची संयुक्त चौकशी सुरू आहे.



Comments