वरोरा शहराचा पाणीपुरवठा: ५४ वर्ष जुनी तूराणा नदी योजना कुचकामी .शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक संकटात
शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक संकटात
वरोरा ८/१/२०२६
चेतन लूतडे
वरोरा: शहराचा मुख्य पाणीपुरवठा करणारी १९७२ साली बांधलेली तूराणा पाणीपुरवठा नदी योजना आता कोसळण्याच्या मार्गावर आहे. अर्धशतकापेक्षा जुनी झालेली ही व्यवस्था आजच्या वाढलेल्या लोकसंख्येपुढे पूर्णतः अपुरी पडत असून, गळतीग्रस्त मुख्य पाईपलाईन, अप्रभावी फिल्टर प्लांट आणि पाणीगळती, व स्पष्ट नसलेल्या नकाशामुळे शहरवासियांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.
१९७२ ची योजना, २०२६ ची गरज:
१९७२ मध्ये तत्कालीन लोकसंख्येच्या गरजेनुसार बांधण्यात आलेला हा २.५ एमएलडी क्षमतेचा प्लांट आज मुदत बाह्य ठरलेला आहे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने पाण्याची मागणीही पटीने वाढली आहे. पाणीपुरवठा तज्ज्ञांच्या मते, आज वरोरा शहरासाठी दररोज किमान १५ ते २० एमएलडी पाणी पुरवठा करू शकणारी आधुनिक योजना आवश्यक आहे.
पुरानी पाईपलाईन, थातूरमातूर पुरवठा:
तूराणा गावापासून फिल्टर प्लांटपर्यंत ३०० मिमी (बारा इंच) चार किलोमीटरची लाईन आणि फिल्टर प्लांटपासून टाकीपर्यंत २५० मिमी (दहा इंच) अंदाजे तीन किलोमीटर, जुनी पाईपलाईन आहे. यात मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने प्लांट २४ तास चालू असूनही शहराला पुरेसे पाणी पोहोचू शकत नाही. परिस्थिती इतकी बिकट आहे की, शहराला पाणी पुरवण्यासाठी नगरपालिकेने ६० ते ६५ बोरवेल मारून ते जुनी पाईपलाईनशी जोडले आहेत. शिवाय, १९७२ पासूनच्या शहरात पसरलेल्या पाईपलाईनचा नकाशा नगरपालिकेकडे नसल्यामुळे दुरुस्तीचे कामही योग्य पद्धतीने होऊ शकत नाही.
कर्मचाऱ्यांची कमतरता, ठेकेदारी पद्धत:
पाणीपुरवठा खात्यात कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता असल्याने ही संपूर्ण सेवाच कोलमडलेली आहे. त्यामुळे ठेकेदारी पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट देऊन योजना चालवण्यात येत आहे. या ठेकेदारांच्या माध्यमातून पुरवले जाणारे पाणी किती शुद्ध आहे, यावरही प्रश्नचिन्ह आहे. काही भागात जुन्या कोळसा खदानीमुळे बोरवेल मारता येत नसल्याने तेथील लोकांची स्थिती अधिक दयनीय आहे.
शुद्ध पाण्यासाठी एटीएम, नागरिकांवर आर्थिक ओझे:
या परिस्थितीत एका एनजीओमार्फत शहरात ११ वॉटर एटीएम स्थापन करण्यात आली आहेत. यामधून नागरिकांना शुद्ध केलेले पाणी २० लिटरसाठी ५ रुपये दराने विकत घ्यावे लागते. शिवाय, नगरपालिका दरवर्षी प्रति कनेक्शन सुमारे १२०० रुपये पाणी कर गोळा करते. अंदाजे ५०००-६००० नळकनेक्शन वरोरा शहरात असल्याची माहिती आहे.
नवीन प्रशासनास मोठे आव्हान:
ही समस्या दशकांपासून सलग चालत आलेली असून, यावर कायमस्वरूपी उपाय योजला केलेली नाही. वारंवार तात्पुरते दुरुस्तीचे खर्च केले जात असले तरी स्थायी समाधानाकडे दुर्लक्ष होत आहे. सदर समस्येचे स्थायी निराकरण करणे हे आता नव्याने पदास्त झालेल्या नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांच्या प्रशासनावर धुरा पडलेली आहे. यामध्ये सर्व पक्षांनी व स्थानिक लोक नेत्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी व वरोरा शहराच्या भविष्यासाठी एक कार्यक्षम, टिकाऊ आणि विस्तारक्षम पाणीपुरवठा योजना राबविणे अत्यावश्यक झाले आहे.
वरोरा शहरांमध्ये शुद्ध पाण्याच्या पिण्याची व्यवस्था एक दिवसाआड काही प्रभागामध्ये केली जाते. रेल्वे स्टेशनच्या मागील भागातील टिळक वार्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड, सरदार पटेल वार्ड, मालवीय वार्ड यामध्ये पाणीपुरवठा होत नाही. त्यांना बोरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.
वरोरा शहरांमध्ये पाण्याचे स्त्रोत कमी असल्यामुळे नवीन कनेक्शन देताना फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. थातूरमातूर पाईपलाईन टाकून कनेक्शन दिल्या जात आहे. त्यामुळे नळाला पाणी येत नसल्याची समस्या मोठ्या प्रमाणात शहरात निर्माण झाली आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी खाली जात असल्याने ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतो.
..................
वरोरा नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
श्री शंभूनाथजी वरघने यांची वरोरा नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
.............................
Comments
Post a Comment