वरोरा
अचूक आधुनिक शेती (Precision Farming), कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीत सकारात्मक बदल घडत आहेत, या उद्देशातून आनंदवन कृषी तंत्र विद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री. सूरज कुंभारे हा स्वयंस्फूर्तीने पुढे येत ड्रोन व्यवसायात आपले पाऊल ठेवत आहे. श्री.कुंभारे स्वतः शेतकरी कुटुंबातील असून वरोरा तालुक्यातील वडगाव गावचे रहिवासी आहेत. आनंदवनातून दोन वर्षाचा कृषी पदविका पूर्ण केल्यानंतर त्यांनी उद्योजकतेतील वेगवेगळे प्रयोग करत नंतर त्यांना ड्रोन व्यवसायाबाबत ची आवड निर्माण झाली. त्यांनी बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली येथून व्यावसायिक ड्रोन प्रशिक्षण घेतले असून ते परवाना प्राप्त ड्रोन प्रशिक्षक व ड्रोन पायलट आहेत. सध्या ते वरोरा येथे स्वतःचे ड्रोन प्रशिक्षण व कृषी सेवा केंद्र यशस्वीपणे चालवत असून, शेतीसाठी उपयुक्त अशा ड्रोन सेवांद्वारे शेतकऱ्यांना अल्पदरात ड्रोनफवारणी सेवा व मार्गदर्शन करत आहेत.
श्री. सूरज कुंभारे यांना आनंदवन कृषी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. हर्षदा पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी-उद्योजकतेत पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.
विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी या प्रात्यक्षिकाचे दि. ०१ जानेवारी रोजी आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्राचार्य डॉ. पोतदार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अचूक शेतीचे महत्त्व विशद केले. ड्रोन व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शेती अधिक उत्पादनक्षम व किफायतशीर कशी बनू शकते, यावर त्यांनी भर दिला. तसेच ड्रोन आधारित सेवा हे नवोदित कृषी उद्योजकांसाठी प्रभावी स्टार्ट-अप मॉडेल ठरू शकते, असे मत व्यक्त केले.
यावेळी कविता हिरणखेडे, उपविभागीय कृषी अधिकारी वरोरा यांनी ड्रोनसंबंधित विविध शासकीय योजना, अनुदान, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी यांची सविस्तर माहिती दिली. शासनाकडून ड्रोन तंत्रज्ञानाला मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे कृषी क्षेत्रात नवे रोजगार व स्वयंरोजगाराचे मार्ग खुले होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
प्रात्यक्षिकादरम्यान विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले. शेतीशी निगडित स्टार्ट-अप क्षेत्रात त्यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे, तसेच विश्वस्त श्री. कौस्तुभ आमटे, सौ. पल्लवी आमटे तसेच श्री. सुधाकर कडू यांनी त्याचे विशेष कौतुक करत अभिनंदन केले. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या प्रचार- प्रसारासाठी केलेल्या त्याच्या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment