*सर्वच राजकीय पक्षात आयाराम गयारामला महत्व**निष्ठावान कार्यकर्त्यात नाराजी!* *नगराध्यक्षासाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता*

*वरोडा नगरपरिषद निवडणूक:वार्तापत्र*

  *श्याम ठेंगडी*
--------------------------------------- 
 *सर्वच राजकीय पक्षात आयाराम गयारामला महत्व*
*निष्ठावान कार्यकर्त्यात नाराजी!*
 *नगराध्यक्षासाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता*
वरोडा : शाम ठेंगडी 

               वरोडा नगरपरिषदेच्या  नगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात असून  नगराध्यक्ष पदासाठी होणारी लढत ही तिरंगी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत शहरातील १३ प्रभागातील २६  नगरसेवक पदांसाठी एकूण 150 उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आयाराम गयाराम करणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा सूर असून यामुळे सर्वच पक्षात बऱ्याच प्रभागात बंडखोरी झाल्याने याचा फटका त्या त्या पक्षाच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयाराम गयाराम ना उमेदवारी दिल्यामुळे राजकीय पक्षाचे काही कट्टर समर्थक आपआपल्या पदाचा राजीनामा देत असून यात वाढ होण्याची शक्यता आहे. 
राज्यात सत्तारूढ असलेली महायुती व विरोधात असलेले महागठबंधन यांच्या घटक पक्षात अपवाद वगळता इतर ठिकाणी एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे हे सर्व हे घटक पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात आपले भाग्य आजमावत आहे नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे माया रमेश राजूरकर, काँग्रेसतर्फे अर्चना आशिष ठाकरे, शिवसेना शिंदे गटातर्फे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या पत्नी ज्योती नितीन मत्ते, राष्ट्रवादी अजित गटातर्फे रंजना पारशिवे तर शिवसेना उबाठा गटातर्फे सोनल पंकज नाशिककर या निवडणूक रिंगणात आहेत. 
         वरोडा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिलांसाठी राखीव असल्याने राजकीय पक्षांना ओबीसी महिला उमेदवार मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. काही पक्षांना तर उमेदवार आयात करावे लागले.
      नगरपरिषद अध्यक्ष पदासाठी भाजप व काँग्रेस यांच्यातच सरळ लढत होण्याची शक्यता असली तरी शिवसेना शिंदे गट कटाच्या ज्योती मत्ते यांची भूमिका महत्त्वाची असल्याने ही लढत तिरंगी होऊ शक्यते.
      भारतीय जनता पक्षाने भाजपचे वरोडा - भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रचार प्रमुख डॉ.रमेश राजुरकर यांची सुविद्य पत्नी माया राजुरकर यांना उमेदवारी दिली आहे. उच्चविद्याभूषित असणाऱ्या माया राजुरकर यांना  नागरिकांच्या समस्येची जाण असून त्यांना राजकीय बाळकडू घरातूनच मिळालेले असून अनेक सामाजिक कार्याची त्यात जोडल्या गेल्या असल्यामुळे त्या आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांसाठी जड जातील अशी चर्चा आहे. 
          काँग्रेसने आपल्या पक्षातील ओबीसी महिला कार्यकर्त्याला संधी न देता राजकारणात अगदी नवख्या असणाऱ्या अर्चना आशिष ठाकरे यांना निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली. अर्चना ठाकरे यांचे पती आशिष ठाकरे हे कॉन्ट्रॅक्टदार असून त्यांनाही राजकारणाचा गंध नाही. शिवाय निवडणूक लढवण्याची त्यांची मानसिकता नसतांही त्यांना काहीच्या आग्रहास्तव निवडणुकीत उतरावे लागले असे बोलले जात आहे. अगदी नवख्या असलेल्या उमेदवारांमुळे काँग्रेस अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत समजली जाते. त्यामुळे ठाकरे यांच्या पाठीशी असलेली खासदारांची ताकद त्यांच्या उमेदवारीला मजबूत समजली जाते. 
     भाजप व काँग्रेस यांच्यातील मुख्य लढतीत शिवसेना शिंदे गटाची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या पत्नी ज्योती मत्ते यांना शिवसेनेने उमेदवारी दिली असून शिवसेनेच्या शिंदे गटाचे लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. मुकेश जीवतोडे हे विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते. तसेच त्यांच्या मागे उभी असलेली युवकांची फळी व जनमत याचा फायदा निश्चितच ज्योती मत्ते यांना मिळू शकतो. त्यामुळे त्याही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात.
      राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे रंजना पारशिवे या नगराध्यक्ष पदासाठी आपले भाग्य आजमावत असून त्या राष्ट्रवादी महिला विभागाच्या जिल्हाध्यक्ष, विदर्भ भोई समाज सेवा संघाच्या तसेच राष्ट्रीय ओबीसी क्रांती दलाच्या विदर्भ, वीरांगणा राणी झलकारी बाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्षा व अखिल भारतीय विमुक्त जनजाती वेल्फेअर संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी ही  प्रभावी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेनेच्या उबाठा गटातर्फे माजी नगरसेवक पंकज नाशिककर यांनी आपली पत्नी सोनम नाशिककर यांना नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात उतरवले असले तरी त्या राजकीय क्षेत्रात नवख्या आहेत. शिवाय कुबोटा गटाच्या प्रभावी नेत्यांच्या पक्षत्यागामुळे उबाठाचा शहरात जनाधार आता उरलेला नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी नगण्य समजल्या जात आहे.
         सध्या तिरंगी वाटत असलेली नगराध्यक्ष पदाची निवडणूक भाजप व काँग्रेस या दोघांमध्येच होणार हे पक्के समजले जाते.परंतु इतर उमेदवार त्यांचे राजकीय गणित बिघडवू शकतात हे मात्र नक्की.
 
           नगरपालिकेच्या १३ प्रभागातून 26 नगरसेवकांच्या पदांसाठी एकूण 150 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र प्रत्येक राजकीय पक्षाने नगरसेवकाच्या पदासाठी इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना जवळ करून त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्या त्या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले असून ते निवडणुकीपासून स्वतःला दूर ठेवत आहेत. काहींनी तर अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या पक्षांना त्यांच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांची नाराजी हे राजकीय पक्ष कश्याप्रकारे दूर करतात हेच पाहणे महत्त्वाचे आहे.

Comments