नागरिकांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधणारे निवेदन; दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर
दिव्यांग नागरिकांचे ५% निधी थकविल्याने आंदोलनाचा इशारा; नगर परिषदेला निवेदन सादर
वरोरा, दि. १८ मार्च – शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसह दिव्यांग नागरिकांचा ५ टक्के निधी थकविल्याप्रकरणी जिल्हा शांतता समिती सदस्य शेख जैरुदीन (छोटूभाई) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे यांना निवेदन सादर करून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नगर परिषद कार्यालयात आयोजित बैठकीत शेख जैरुदीन यांनी सांगितले की, शहरातील हजारो नागरिक कर भरूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
दरवर्षी ५० ते ६० लाख रुपये उपभोक्ता कर भरूनही दर दोन दिवसांनी घंटागाडी येत असल्याने घरात कचरा साचतो. दररोज घंटागाडी पाठवावी अन्यथा कर अर्धा करावा.
अनेक महिन्यांपासून फवारणी न झाल्याने मच्छर व विषारी जंतूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. महिन्यातून दोन वेळा फवारणी करण्याची मागणी केली आहे. शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावा घेतला असून त्वरित कारवाई करावी.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई निर्माण होते. पाण्याच्या टाक्या व नदीवर कच्चा बंधारा बांधून नियमित पाणीपुरवठा करावा. अनेक वर्षांपासून राहत असलेल्या गोरगरीब नागरिकांना जमिनीचे लीज व पट्टे मंजूर करावेत. तसेच प्रलंबित प्रधानमंत्री व रमाई घरकुल योजनांची प्रकरणे मार्गी लावून गोरगरीबांना घरकुल उपलब्ध करून द्यावी. यासंबंधातील मागण्या नगरपालिकेचे माजी सभापती छोटू भाऊ शेख यांनी केली आहे.
दिव्यांग निधी प्रकरण
शिष्टमंडळाने दिव्यांग नागरिकांच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधले. शेख जैरुदीन यांनी सांगितले की, शासनाच्या नियमानुसार दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला नगरपालिकेच्या वार्षिक उत्पन्नातील ५ टक्के निधी दिव्यांग लाभार्थ्यांना वितरित करण्यात येतो. मात्र यावर्षी २०२५-२६ मध्ये १७ मार्च उलटूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शहरातील २८७ दिव्यांग लाभार्थ्यांना ३१ मार्चपूर्वी हा निधी वितरित न केल्यास नगरपालिकेत 'भीक मागो व ठिय्या आंदोलन' करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
निवेदन स्वीकारताना नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी मागण्यांची पूर्तता लवकर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी सभापती मोहसीन पठाण, दिलीप बाबू, सचिन ढवस, प्रशांत पिपरे, अनिस शेख, शाहरुख शेख, प्रमोद ठावरे, प्रफुल घोडमारे, विशाल रुयारकर, वसंता पेंदाम, काजल गहुकर, जीवनदास भगत, लता मांडेकर, नीलिमा करलुके, राजीव कासावार, आकाश शेंडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व दिव्यांग व्यक्ती उपस्थित होते. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी चंद्रपूर व पोलीस निरीक्षक वरोरा यांनाही पाठवण्यात आली आहे.
नकाराध्यक्ष अर्चनाताई ठाकरे
या सगळ्या विषयांवर चर्चा करून नगाराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी या सर्व बाबींवर कार्य करत असून लवकरच त्या पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. मागील चार वर्षापासून नगरपालिकेमध्ये कोणतेही काम झालेले नव्हते. त्यामुळे हे सर्व काम सुरळीत होण्यासाठी काही वेळ लागेल अशी प्रामाणिक खंत व्यक्त केली.
............
Comments
Post a Comment