वरोरा
चेतन लूतडे
वरोरा : वरोरा शहराजवळील वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात दोन मुलांना वाचवण्यात यश आले तर दोन मुलांना बचावण्यास अयशस्वी ठरले.
रविवारी दुपारी वरोरा येथील कर्मवीर वार्डमधील रुपेश विजेंद्र खूळसंगे (वय १३ वर्ष) आणि प्रणय विनोद भोयर (वय १५ वर्ष) ही दोन मुले त्यांच्या दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी वरोरा शहरातून सायकलने वर्धा नदीच्या तुराणा घाटावर गेली होती. नदीपात्रात खोल पाणी असल्याने तिथे पोहत असताना चारही मित्र बुडू लागले.
या संकटाचा आवाज ऐकल्यावर जवळच असलेल्या एका गुराख्याने त्वरित बचावकार्य सुरू केले.
गुराख्याने उमंग धर्मेंद्र आत्राम आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे या दोन मुलांना यशस्वीरित्या किनाऱ्यावर काढले. मात्र, दुर्दैवाने रुपेश आणि प्रणय ही दोन मुले खोल पाण्यात वाहून गेली आणि त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर येथील पोलीस रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. मृत मुलांच्या शवांचा शोध घेण्यासाठी शोधकार्य सुरू आहे.
या अकाली मृत्यूमुळे मुलांच्या कुटुंबीयांवर तसेच मित्र-नातेवाईकांवर कोसळलेल्या शोकाकुल संसर्गाने सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments
Post a Comment