*वरोड्यातील गणेश विसर्जन शांततेत.**डीजे व लेझर लाईट चा मंडळांनी केला वापर.**नियोजनाचा अभाव, रात्री झाला होता तणाव* *गणेश मंडळ अध्यक्षांचा गौरव*
*डीजे व लेझर लाईट चा मंडळांनी केला वापर.*
*नियोजनाचा अभाव, रात्री झाला होता तणाव*
*गणेश मंडळ अध्यक्षांचा गौरव*
वरोडा : शाम ठेंगडी
वरोडा शहरात अतिशय भक्तिमय आणि उत्साही वातावरणात सात सप्टेंबर रोज रविवारला गणेश विसर्जन शांततेत पार पडले मात्र वेळ संपल्यावर पोलिसांनी डीजे बंद केल्यामुळे काही काळ गणेश मंडळाचे सदस्य संतप्त झाले व त्यांनी जवळपास एक तास मिरवणूक थांबवून ठेवली यामुळे गणेश विसर्जन रात्र बारापर्यंत चालले.
शहरातील मानाच्या गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिर गणेशोत्सव समिती व हनुमान मंदिर गणेशोत्सव समिती या दोन्ही मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन सकाळी 11 पर्यंत आटोपले होते.यापूर्वी या दोन्ही मानाच्या गणपतीच्या अध्यक्षांचा विशेष सन्मान करण्यात आला.
गणेश विसर्जन मार्गावर भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ( शिंदे) व शिवसेना उबाठा तसेच मुस्लिम समाजाने मंडप टाकून टाकले होते. सर्वोच्च न्यायालयाने डीजेचा वापर प्रतिबंधित केलेला असतानाही काही राजकीय पक्षांनी आपल्या मंडपाच्या बाजूला डीजे लावले होते हे विशेष.
राजकीय पक्षांच्या मंडपात त्या त्या पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रत्येक गणेश मंडळाच्या अध्यक्षांना सन्मानित करण्यात येत होते. नगर परिषदेतर्फे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांनी गणेश मंडळाचे अध्यक्षांचा अनोख्या पद्धतीने केलेला सत्कार आकर्षणाचा विषय ठरला. त्यांनी प्रत्येक मंडळाचे अध्यक्ष यांना संविधानाची प्रस्तावना, झाडाचे रोप व श्रीफळ देऊन सत्कार केला.संविधानाची प्रस्तावना देण्याच्या कृतीद्वारे लोकशाही मूल्य व सामाजिक जबाबदारीला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा प्रयत्न ठरला. गणेश मंडळांसोबत असलेल्या भजन मंडळी सोबत भजनावर त्यांनी ठेकाही धरला.
ढोल ताशा, डीजे यांच्या तालावर गणेश मंडळाचे तरुण सदस्य थिरकत व गुलाल उधळत गणेश मंडळांनी दहा दिवस विराजमान केलेल्या बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला. वरोडा रोटरी क्लबतर्फे नागरिक व गणेश मंडळाचे सदस्य यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.
येथील डोंगरवार चौकात तीन बाजूंनी गणेशाचे आगमन होते. दरवर्षी ज्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केल्या जाते. यावर्षी मात्र येथे नियोजनाचा अभाव आढळून आला. त्यामुळे येथे पोलिसांना कसरत करावी लागली.
रात्री दहा वाजता पोलिसांनी मिरवणुकीतील मंडळाचे डीजे बंद केल्यामुळे गणेश मंडळाच्या सदस्यांनी डीजे सुरू करण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु ते आपल्या भूमिकेवर ठाम होते.त्यामुळे मिरवणूक जवळपास एक तास खोळंबली होती.यानंतर मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांनी समजूत काढल्यानंतर गणेश विसर्जनासाठी मिरवणूक समोर निघाली.
गणेशोत्सव गणेश विसर्जन मिरवणुकीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी असलेल्या शांतता समितीच्या सदस्य मिरवणुकीत दिसले नाहीत.सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही यावर्षी मिरवणुकीत गणेश मंडळांनी केलेला डीजे व लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणावर होता.
या प्रसंगी आमदार करण देवतळे, भाजपचे रमेश राजूरकर, संतोष पवार, खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी नगराध्यक्ष विलास टिपले,राजेंद्र चिकटे, शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा समन्वयक मुकेश जीवतोडे, राष्ट्रवादीचे विलास नेरकर,शिवसेना उबाठाचे दत्ता बोरकर आदी प्रमुख मंडळीच्या हस्ते गणेश मंडळ अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
गणेशोत्सव काळात गणेश मंडळांनी शहरात केलेल्या उत्कृष्ट सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक करीत, गणेश मंडळांनी केलेल्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
शहरवासीयांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण विसर्जन मिरवणूक भक्तिमय घोषणांनी, ढोल-ताशांच्या गजराने वरोडा नगरी दुमदुमली.
गणरायाच्या निरोपावेळी सर्वांनी “पुढच्या वर्षी लवकर या!” या जयघोषात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बागल व पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक अनिल मेश्राम,शरद भस्मे, किशोर मित्तलवार, गुप्तचर विभागाचे राजेश वराडे यांचे सह वीस अधिकारी, तब्बल 300 पोलीस होमगार्ड, दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाचे जवान यांचा चौख पोलीस बंदोबस्त होता.
Comments
Post a Comment