*वनजमिनीवरील घरांबाबतची सत्यता स्पष्ट-बैठकीत निर्णय*
*चंद्रपूर, दि. 25: बल्लारपूर येथील रवींद्र नगर, मौलाना आझाद वॉर्ड, पं. दीनदयाल वॉर्ड व डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्डातील नागरिक गेल्या 30-40 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नावाखाली या भागातील अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याच्या अफवा काहीजण हेतुपुरस्पर पसरवत आहेत. या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. नागरिकांच्या हिताचे रक्षण ही माझी नैतिक जबाबदारी असून मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.*
बल्लारपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात वनजमिनीवरील घरांबाबतच्या अफवांवर स्पष्टता मिळवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते.
बैठकीला भाजपा जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. व्यवहारे, उपविभागीय अधिकारी अजय चरडे, भाजपाचे काशीनाथ सिंह, तहसीलदार रेणुका कोकाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ आदींची उपस्थिती होती.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नागरिकांनी एक एक पैसा जमा करून घरे उभारली आहेत. एका बाजूला शासन बेघरांना घरे देण्याचे कार्य करीत आहे, तर दुसऱ्या बाजूला काहीजण अफवा पसरवून बल्लारपूर येथील चार वॉर्डांतील रहिवाशांना हटविले जाणार असल्याचे चुकीचे चित्र उभे करत आहेत. अनेक नागरिक नझुल, वेकोली तसेच वनविभागाच्या जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. या नागरिकांना पट्टे देण्यासंदर्भात नियोजन केले जात असून, आतापर्यंत 4,442 प्रॉपर्टीं आयडेंटिफाय करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या काळात येथील नागरिकांना पट्टे देण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. या संदर्भातील मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्रजी यादव यांच्यासमोरही मांडण्यात येईल.
अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे चुकीचे असून, कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे स्पष्ट शब्दांत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित नागरिकांना यावेळी सांगितले.
============================
*आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व्यक्ती / संस्थेकडून अर्ज आमंत्रित*
*Ø अंतिम दिनांक 4 जुलै 2025 पर्यंत*
चंद्रपूर, दि. 26 : आदिवासी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभागामार्फत ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’ व ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण संस्था पुरस्कार’ देण्यात येणार आहे. चंद्रपूर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपुर, बल्लारपुर, राजुरा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, मुल, सावली, सिंदेवाही, पोंभुर्णा या तालुक्यातील आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच सामाजिक संस्था यांच्याकडून 2023-24 व 2024-25 या वर्षाकरिता प्रस्ताव आमंत्रित आहेत.
सदर प्रस्ताव 4 जुलै 2025 पर्यंत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर येथे स्विकारण्यात येतील. विनामुल्य प्रस्तावाचा नमुना व आवश्यक सर्व माहितीसाठी कृपया प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment