वरोरा वनपरिक्षेत्रात मोठी कारवाई; शिंदोला गावात १५ हेक्टर राखीव वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले

वरोरा वनपरिक्षेत्रात मोठी कारवाई; शिंदोला गावात १५ हेक्टर राखीव वनजमिनीवरील अतिक्रमण हटविले

वरोरा : वनविभागाने बुधवारी वरोरा वनपरिक्षेत्रातील रामपूर नियतक्षेत्रांतर्गत शिंदोला गावात मोठी धडक कारवाई करत तब्बल १५ हेक्टर राखीव वनजमिनीवरील अतिक्रमण हटवले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वनविभागाने यापूर्वी १३ अतिक्रमणधारकांना नोटीसा बजावून जमिनीसंदर्भातील कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, संबंधितांनी कोणतेही वैध पुरावे सादर न केल्याने वनविभागाने ही कारवाई केली. सर्व आरोपींवर वनगुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आज पहाटेपासून सुरू झालेल्या या मोहिमेदरम्यान जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने कक्ष क्र. ७ अ मधील बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही जमीन आता सार्वजनिक हितासाठी वापरली जाणार आहे.

अतिक्रमण मुक्त केलेल्या या जागेवर आता गावकऱ्यांच्या मागणीनुसार 'वैरण विकास (गवती कुरण)' प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता होण्यास मदत होणार असून स्थानिक दुग्ध व्यवसायाला चालना मिळणार असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.

ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये क्षेत्र सहाय्यक डी. बी. चांभारे (टेमर्डा), जे. के. लोणकर (शेगाव), आर. पी. राठोड (वरोरा), वनपाल व्ही. एम. ढुमणे, वनरक्षक पी. आर. ब्रम्हणात (रामपुर) यांच्यासह इतर वनकर्मचारी, पोलीस पाटील, संरक्षित वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व PRT सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

वनविभागाच्या या कठोर कारवाईमुळे इतर अतिक्रमणधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अशा बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Comments