एफ.ई.एस. गर्ल्स हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थिनींचे स्वागत व डिजिटल वर्गखोलीचे उ‌द्घाटन

एफ.ई.एस. गर्ल्स हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थिनींचे स्वागत व डिजिटल वर्गखोलीचे उ‌द्घाटन

चंद्रपूर 

एफ.ई.एस. गर्ल्स हायस्कूल, चंद्रपूर येथे आज दि. २३ जून २०२५ नवागत विद्यार्थिनींचे स्वागत समारंभ व डिजिटल वर्गखोलीचे उ‌द्घाटन उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीता महेशकर मॅडम यांनी केली. मुख्याध्यापिका यांनी आपल्या प्रास्ताविकेतून नवागत विद्यार्थिनींचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. उ‌द्घाटक माननीय शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद चंद्रपूर, श्री. राजेश पातळे सर यांनी डिजिटल शिक्षणाची गरज, काळानुरूप शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर आणि आधुनिक वर्गखोलींच्या उपयुक्ततेवर सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उ‌द्घाटक श्री. राजेश पातळे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, जि.प. चंद्रपूर होते. त्यांनी वर्ग पाचवी व सहावीच्या डिजिटल वर्गखोलीचे उ‌द्घाटन केले. विद्यार्थिनींचे स्वागत करत त्यांनी डिजिटल शिक्षणाचे महत्व स्पष्ट केले. मोबाईलचा अयोग्य वापर न करता तो अभ्यासासाठी कसा वापरावा, यावर त्यांनी उदाहरणांसह सांगितले. कृत्रिम बु‌द्धिमता शिकणे व तिचा शिक्षणात वापर करणे काळाची गरज आहे, असे ते म्हणाले. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींचा अभ्यासाचा पाया मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी शिक्षकांना केले. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले. तसेच शिक्षकांनी वि‌द्यार्थिनींचे विश्लेषण करून त्यांना योग्य मार्गदर्शन द्यावे, असा सल्लाही दिला.

या प्रसंगी माननीय शिक्षणाधिकारी श्री. राजेश पातळे सर यांचा शाल, श्रीफळ, रोपटे व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार फीमेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड. श्री. विजयराव मोगरे यांच्या हस्ते करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात अॅड. मोगरे सरांनी नवागत विद्यार्थिनींना पुस्तके वाटून स्वागत केले. त्यांनी सांगितले की शाळा ही वि‌द्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. संस्थेच्या स्थापनेचा इतिहास सांगताना त्यांनी नमूद केले की १९४५ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी या संस्थेची स्थापना केली आणि राजाभाऊ खोब्रागडे यांचे वडील संस्थेस आर्थिक मदत करीत होते. तसेच शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांबाबत, इंग्रजी माध्यमाकडे वाढता कल व कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थ्यांची संख्या घटत असल्याब‌द्दलही त्यांनी मत व्यक्त केले.

कार्यक्रमाला फीमेल एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी सदस्या शांता काकू पोटदुखे, वरिष्ठ महावि‌द्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. चिमणकर सर, शाळेचे पर्यवेक्षक व कलाशिक्षक श्री. किरण पराते सर, तसेच सेवा जेष्ठ प्राध्यापक श्री. देवेंद्र मुगल सर हे मान्यवर म्हणून उपस्थित होते.

सूत्रसंचालन कु. ढोले मॅडम यांनी "ज्ञानदीप प्रज्वलित करून आपण या नवीन वाटचालीचा आरंभकरूया या प्रेरणादायी वाक्याने केले. तर आभार प्रदर्शन मोहितकर मॅडम यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

Comments