फक्त बातमी
वरोरा ; तालुक्यातील टेमुर्डा परिसरात देशी दारूची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री होत असल्याचे पाहायला मिळते. विक्री होत असलेल्या देशी दारूच्या साठ्यापैकी बहुतांश साठा दुय्यम दर्जाचा आणि बनावट असल्याची शक्यता असल्याने मद्यपींच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे. वरोरा तालुक्यातील टेंमुर्डा हे बकरी बाजारा करिता विदर्भात प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. प्रत्येक आठवड्याच्या गुरुवारी या ठिकाणी सकाळी बकरी बाजार व दुपारी आठवडी बाजार भरविला जातो. या बाजारात खरेदी विक्री करिता परिसरातील ३० पेक्षा अधिक गावातील नागरिक येत असतात. तसेच बकरी बाजारात परप्रांतीय नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करिता येत असल्याचे पाहायला मिळते. यामुळे सदर ठिकाणी अवैध दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोपावला असल्याचे म्हटले जाते. मार्गावरील काही दुकानात, तसेच बस स्थानक भागात आणि पिजदूरा मार्गावर अनेक व्यक्ती हा अवैध देशी दारू विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे सांगितले जाते. दररोज मोठ्या प्रमाणात देशी दारूची अवैध विक्री होत असताना संबंधित विभागाकडून परिणामकारक कारवाई होत नसल्याने दारू विक्रेत्यांची हिम्मत चांगलीच वाढली असल्याचे म्हटले जाते. यासोबतच टेंमुर्डा पासून काही अंतरावर असलेल्या एका धाब्यावर देखील देशी दारूची अवैध विक्री होत असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अवैध देशी दारू विक्रीच्या व्यवसायाला अधिकच उधान आले असल्याने सर्वसामान्य नागरिक मात्र त्रस्त झाले आहे. देशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर संबंधित विभागाने परिणामकारक कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने होत आहे.
Comments
Post a Comment