*हर हर महादेवाच्या गजराने दुमदुमली भद्रावती नगरी**हजारो भाविकांनी घेतले श्री भद्रनाग स्वामींचे दर्शन*
*हजारो भाविकांनी घेतले श्री भद्रनाग स्वामींचे दर्शन*
अतुल कोल्हे भद्रावती :-
विदर्भातील सुप्रसिद्ध व प्राचीन भद्रनाग मंदिरात नागपंचमीनिमित्त नागपंचमी यात्रेला प्रारंभ झाला. यानिमित्ताने शहराबरोबरच विदर्भातील हजारो भाविकांनी श्री भद्रनाग स्वामींचे दर्शन घेतले. येथील सुप्रसिद्ध भद्रनाग मंदिरात दरवर्षी नागपंचमीला मोठी यात्रा भरते. आज सकाळी पाच वाजता श्री भद्रनाग स्वामींचा अभिषेक व महाआरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनाला खुले करण्यात आले.
सकाळपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी सुरू झाली. यानिमित्ताने मंदिर प्रशासनातर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आली आहे. याचबरोबर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा करण्यात आले. बाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर प्रशासनातर्फे भाविकांना सहजरित्या दर्शन घेता यावे यासाठी मंदिर परिसरात पुरेशी व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरात व मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून मंदिरापर्यंत जाणारा मुख्य रस्ता गांधी चौकातून वाहनांसाठी बंद करण्यात आला व ही वाहतूक अन्य रस्त्यावरून वळवण्यात आली. सायंकाळच्या सुमारास भाविकांच्या गर्दीत चांगलीच वाढ झाली. मंदिर परिसरात भाविकांसाठी विविध सामाजिक संघटना व राजकीय नेत्यांतर्फे फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.