*महसूल विभागाचे नाव उंचविण्यासाठी जबाबदारीने काम करा* - *जिल्हाधिकारी विनय गौडा* *रक्तदानाने महसूल पंधरवड्याचा शुभारंभ*
- *जिल्हाधिकारी विनय गौडा*
*रक्तदानाने महसूल पंधरवड्याचा शुभारंभ*
अकूंश अवथे चंद्रपूर
चंद्रपूर, दि. 1 : महसूल विभाग हा शासनाचा अतिशय महत्वाचा विभाग असून सर्वसामान्य नागरिकांचा सर्वाधिक संपर्क या विभागासोबत येतो. त्यामुळे नागरिकांना आपल्या विभागाकडून जास्त अपेक्षा आहे. लोकांच्या या अपेक्षेवर खरे उतरून महसूल विभागाचे नाव उंचविण्यासाठी जबाबदारीने काम करा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सर्व अधिकारी व कर्मचा-यांना केले.
नियोजन भवन येथे महसूल दिनानिमित्त (1 ऑगस्ट) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी संजय पवार आदी उपस्थित होते. यावेळी कर्मचा-यांच्या वतीने रक्तदान करून महसूल पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला.
आजपासून महसूल पंधरवडा सुरू झाला, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, महसूल विभागाला जिल्ह्यातील विविध विभागांशी समन्वय ठेवून शासनाचे काम ठराविक कालावधीत करावे लागते. नियमित कामाच्या व्यतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन असो की निवडणूक विषयक कामे, या सर्व कामांमध्ये सर्वाधिक जबाबदारी ही महसूल विभागाची असते. शिवाय नागरिकांचाही सर्वाधिक संपर्क आपल्या विभागाशी येत असतो. त्यामुळे लोकांसाठी आपण काम करतो, याची जाणीव ठेवून जबाबदारीने काम केल्यास आपल्याला सरकारमध्ये तसेच समाजातही सन्मान मिळतो. महसूल संघटनेच्या मागण्या रास्त असून त्या सर्व शासन स्तरावरील आहेत. संघटनांनी आपल्या मागण्या योग्य मार्गाने शासन दरबारी मांडाव्यात, अशाही सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, आजपासून रक्तदान शिबिराने महसूल पंधरवड्याचा शुभारंभ झाला आहे. या पंधरवड्यात चांगल्या पध्दतीने कामकाज करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर उपविभागीय अधिकारी संजय पवार म्हणाले, महसूल विभागात काम करण्याचे भाग्य आपल्याला मिळाले आहे. सर्व विभागांना स्पर्श करणारा हा विभाग आहे. सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक भावनेने काम केले तर आपण नक्कीच यशस्वी होऊ, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शैलेश धात्रक यांनी तर संचालन उपाध्यक्ष अजय मेकलवार यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी –कर्मचारी उपस्थित होते.
*रक्तदान शिबीर* : महसूल दिनानिमित्त नियोजन भवन येथे रक्तदान करण्यात आले. यावेळी राहुल फणसे, सचिन राठोड आणि सुनील चांदेवार यांनी रक्तदान केले. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीचे डॉ. मिलिंद झाडे, डॉ. क्षितीजा यांच्यासह लक्ष्मीकांत गाखरे, पंकज पवार, अमोल रामटेके, आशिष कांबळे उपस्थित होते.
००००००
Comments
Post a Comment