*राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा*

*राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा*

चंद्रपूर, दि. 3 : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचा त्रैमासिक आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. राष्ट्रीय एड्स कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांसाठी विविध आरोग्य योजना सुरू आहेत. या आरोग्य योजना रुग्णांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिल्या.  

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा महिला व बाल संगोपन अधिकारी डॉ. प्राची निहुलकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी दीपक बानाईत, महानगर पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, डॉ. पराग जीवतोडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, वैद्यकीय अधिकारी  ए.आर.टी. डॉ. श्रीकांत जोशी, जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक निरंजन मंगरुळकर, नसीमा शेख अनवर, देवेंद्र लांजे उपस्थित होते.
राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची माहिती सादर करतांना जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत एचआयव्ही समुपदेशन व चाचणी सुविधा मोफत पुरविण्यात येत असल्याची माहिती दिली. गतवर्षी 2023-24 मध्ये जिल्हयात 100915 एचआयव्ही चाचण्या झाल्या. त्यामध्ये 297 सामान्य संक्रमित आढळले. या सर्वांना उपचारावर घेण्यात आले. तसेच 46996 गरोदर मातांची एचआयव्ही चाचणी झाली. त्यात 32 माता संक्रमित असल्याचे आढळल्या. त्याचबरोबर एप्रिल 2024 ते मे 2024 पर्यंत 19183 सामान्य एचआयव्ही तपासण्या करण्यात आल्या. त्यात सामान्य संक्रमित 64 आढळले. तसेच 8687 गरोदर माता यांची एचआयव्ही तपासणी केली त्यात 14 संक्रमित आढळले. जिल्ह्यात या महिन्यात रेड रिबन क्लबच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मॅराथॉन स्पर्धा तसेच प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात येत असून याद्वारे मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे श्री. पानगंटीवार यांनी सांगितले.

जिल्ह्यातील अतिजोखीम गटात असणाऱ्या समुदायातील प्रत्येकाला सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अशासकीय संस्थांची मदत घेऊन त्यादिशेने कार्य करण्याच्या  सूचना विवेक जॉन्सन यांनी दिल्या. तसेच एचआयव्हीसह जगणाऱ्यासाठी शासनाची मोफत बस पास योजना असून त्याचा लाभ प्रत्येक एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तीला मिळावा, यासाठी देखील बस महामंडळाला सुचना करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले.

बैठकीला संबोधन ट्रस्टचे राज काचोळे, संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थेचे रोशन आकुलवार, ट्रकर्स प्रकल्प नोबल शिक्षण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक गोपाल पोर्लावार, मायग्रंट प्रकल्प नोबल शिक्षण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक माधुरी डोंगरे, विहान प्रकल्पाच्या संगिता देवाळकर आदी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
०००००००

Comments