कार्यकर्त्यांचा सन्मान हा माझा सन्मान - डॉ. विकास आमटे

कार्यकर्त्यांचा सन्मान हा माझा सन्मान - डॉ. विकास आमटे 

वरोरा-
डॉ. प्रवीण मुधोळकर

 आनंदवनाची निर्मिती ही अनेक कार्यकर्त्यांच्या श्रम आणि कौशल्यातून झालेली आहे. ही सर्व अशक्यप्राय कामे करताना मी आणि कार्यकर्ते एकरूप होऊन गेलो होतो. त्यामुळेच मी स्वतःला कार्यकर्त्यांपासून कधीही वेगळे समजले नाही. म्हणूनच माझ्या कार्यकर्त्यांना मिळणारा सन्मान हा माझा सन्मान आहे ही भावना मला आनंद देते. आनंदवन निर्मितीच्या प्रतिकूल अवस्थेत अमूल्य योगदान दिलेले सुधाकर कडू यांना स्व. ऍड. रावसाहेब शिंदे स्मृती राज्यस्तरीय शिक्षण साहित्य पुरस्कार  तसेच आनंदवन आपल्या परिश्रमाने जलसंपन्नता निर्माण करणारे अशोक बोलगुंडेवार यांना स्व. ऍड रावसाहेब शिंदे स्मृती राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार  विश्व लक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान श्रीरामपूर तर्फे प्रदान करण्यात आला. आनंदवन येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विकास आमटे बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे तसेच आनंदवनाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती वहिनी आमटे या उपस्थित होत्या.ते पुढे म्हणाले की आनंदवनाच्या निर्मितीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी जीवन अर्पित केलेले आहे. 

या ऐतिहासिक कार्याची दखल समाजाने घ्यावे असे सातत्याने वाटते. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान,श्रीरामपूर यांनी या कार्याची दखल घेऊन केलेल्या सन्मानामुळे कृतार्थ झाल्यासारखे वाटते. या सत्काराला उत्तर देताना सुधाकर कडू म्हणाले की आनंदवन हे एकलव्याचे विद्यापीठ असून डॉक्टर विकास आमटे हे त्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात आम्हा कार्यकर्त्यांना जीवनाचे अनेक अनुभव मिळाले. तर अशोक बोलगुंडेवार यांनी पाणी प्रश्नावर काम करताना त्या वेळच्या आठवणींना उजाळा दिला.ते म्हणाले की आनंदवनाच्या भूमी विषयी समाजामध्ये अत्यंत स्वरूपाची नकारात्मक भावना होती. डॉक्टर विकास भाऊ आमटे यांच्या प्रेरणा आणि सहभागीतेमुळे हे पाणी निर्मितीचे अशक्यप्राय काम पूर्ण करता आले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना  सुखदेवजी सुकळे म्हणाले की,  आनंदवन आणि श्रीरामपूरचा  अनेक वर्षांचा ऋणानुबंध पुढे देखील कायम राहणार आहे. आनंदवनातील कर्मवीरांना पुरस्कृत करताना आम्हाला धन्य झाल्याची भावना जाणवते. 
या पुरस्कार सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये आनंदवनाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पोळ, ज्येष्ठ कार्यकर्ता माधव कवीश्वर, ज्येष्ठ साहित्यिक ना. गो. थुटे, दिनेश पारख, डॉ. यशवंत घुमे, सदाशिव ताजने,यांचा प्रामुख्याने समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी  आभार प्रदर्शन श्री राजेश ताजणे यांनी व्यक्त केले.

Comments