पोलीसाची धमकी दाखवूनपाच हजार रुपयाची केली वसुली.

पोलीसाची धमकी दाखवून
पाच हजार रुपयाची केली वसुली.

वरोरा 3April2024

 शेतकरी स्वतःच्या मालकीचे बैल बाजारातून घरी नेत असताना पोलिसांचा धाक दाखवून पाच हजार रुपये वसूल करणाऱ्या दोघांना वरोरा पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. .
 नितीन बावणे व प्रवीण सिंग अशी आरोपींची नावे आहेत. दोघांविरुद्धही खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हे बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याची चर्चा आहे.
वरोरा तालुक्यातील थोराना येथील शरद चटकी हे एमएच ३४ - एबी ७२२५ महिंद्रा पिकअपने शेंबळ येथील भय्याजी जीवतोडे यांचे दोन बैल घेऊन वरोरा येथील बाजारात आले होते. बैलाला ग्राहक न मिळाल्याने ते परत गावाकडे येत असताना आरोपी नितीन बावणे व प्रवीण सिंग हे दोघे दुचाकी वाहनाने पिकअपला आडवे आले. आम्ही बजरंग दलाचे कार्यकर्ते असून, पिकअप वाहनातील बैल व्यापाऱ्याकडे नेत आहात. त्यामुळे तुम्हाला पोलिस ठाण्यात नेतो, अशी धमकी दिली. शरद चटकी यांनी दोन बैल शेतकऱ्याचे आहेत. विक्री न झाल्याने बैल बाजारातून घरी नेत असल्याचे सांगितले. मात्र, हे दोघेही युवक समजून घ्यायला तयार नव्हते. त्यांनी प्रकरण मिटवायचे असेल तर पाच हजार रुपये द्या, असा तगादा लावला. शरद चटकी - यांच्याकडे रक्कम नसल्याने त्यांनी शेंबळ येथील आपला साळा रोहित

डाखोरे याला बोलावून आरोपी नितीन बावणे व प्रवीण सिंग याला पाच हजार रुपये देण्यास सांगितले. त्या दोघांनी पाच हजार रुपये स्वीकारले.

पोलिसांचा धाक दाखवून आपल्याकडून खंडणी वसूल केल्याचे लक्षात येताच शरद चटकी यांनी वरोरा पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी दोघांनाही अटक करून त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

---------------------------------------------------------------
 *रोहित डाखोरे यांनी आरोपी नितीन बावणे व प्रवीण सिंग या दोघांना रोख रक्कम जवळ नसल्याचे सांगितले. त्या दोघांनी 'फोन पे' केल्यास चालेल, असे सांगून फोन पेद्वारे पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. त्यामुळे ते दोघेही पुराव्यासह पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकले. पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहेत.*

Comments