पत्रकारांनी जबाबदारीने लिखाण करणे महत्त्वाचे आहे --आमदार प्रतिभा धानोरकर # वरोरा तालुका पत्रकार संघाच्या जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन
# वरोरा तालुका पत्रकार संघाच्या जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन
वरोरा दिनांक 7 जानेवारी
आज वर्तमानपत्रांसोबतच व्हाट्सअप आणि सोशल मीडियावर पत्रकारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अनेक सकारात्मक बातम्या वर्तमानपत्रे आणि इतर माध्यमे देतात. पण अनेकदा बातमी देताना काळजी घेतली जात नाही हे लक्षात येतं. तेव्हा चांगल्या आणि वाईट बातम्या देताना एखाद्याचं आयुष्य उध्वस्त होणार नाही याची काळजी पत्रकारांनी घ्यावी. आपल्या बातमीमुळे चुकीचा संदेश समाजात जाऊ नये याची काळजी घेतल्यास कोणाचेही नुकसान होणार नाही. कारण चुकीच्या बातमीमुळे झालेले नुकसान आयुष्यात भरून निघत नसल्याचे प्रतिपादन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले
वरोरा तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून नूतन कार्यालय लोकार्पण तथा मान्यवरांचा सत्कार शनिवार ला पत्रकार संघाच्या जुनी नगरपालिका येथील कार्यालयात आयोजित केलेला होता, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या
यावेळी मंचावर जिल्हा माहिती अधिकारी चंद्रपूर, राजेश येसनकर, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जयंत टेंमुर्डे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले गडचिरोली येथील सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने, जेष्ठ पत्रकार राजाभाऊ लोणारकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळू भोयर, वरोरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा प्रवीण खिरटकर हे मंचावर म्हणून उपस्थित होते .
या प्रसंगी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पत्रकार संघाच्या नूतन कार्यालयाचे लोकार्पण फीत कापून करण्यात आले.
वरोरा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला असून पत्रकारांनी उत्तम कार्य या शहरात केलेले आहे असे सांगत आ धानोरकर पुढे म्हणाल्या की, आता या नूतन कार्यालया सोबतच मोठे पत्रकार भवन वरोरा शहरात व्हावे. त्याकरिता शासनाने जागा दिल्यास आमदार निधीतून 25 ते 30 लाख रुपये देणार असल्याचे आश्वासन आ धानोरकर यांनी याप्रसंगी दिले. पत्रकार किंवा राजकारणी हे कायमस्वरूपी नसतात परंतु निर्माण झालेली वास्तू कायम स्मरणात राहील असेही त्या म्हणाल्या.
पत्रकार संघाचे सदर कार्यालय हे वरोरा तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना, संस्था आणि सर्वसामान्य व्यक्तींना पत्रकार परिषदा घेण्याकरिता विनामूल्य उपलब्ध असणार हे ऐकून आनंद झाल्याचेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, जयंत टेमुर्डे, विलास टिपले, बाळू भोयर आदींनी आपले विचार व्यक्त केले.
वरोरा शहराच्या लौकिकात भर घालणारे आदित्य चंद्रभान जिवने (IAS ), सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल वरोरा भूषण सन्मानाने गौरविण्यात आले. तसेच जीवने यांच्या आई-वडिलांचा सत्कार सुद्धा याप्रसंगी करण्यात आला. आदित्य जीवने यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले .
पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य राजाभाऊ लोणारकर यांना जीवनगौरव तसेच वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी निवडून आलेले ज्येष्ठ पत्रकार बाळू भोयर यांचा विशेष सन्मान याप्रसंगी करण्यात आला. माजी नगरसेवक राजू महाजन, पत्रकार गजानन मांढरे आणि गायनाच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या स्नेहल शिरसाट यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
स्नेहल शिरसाट हिने गायलेल्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरोरा तालुका पत्रकार संघाचे सचिव डॉ. प्रशांत खुळे यांनी केले. शहरातील पत्रकारांसोबतच गणमान्य व्यक्तींची मोठी उपस्थिती याप्रसंगी होती
फोटो...
Comments
Post a Comment