समाजाने विविध क्षेत्रातील नेतृत्वाचा पुढच्या पंचवीस वर्षाचा रोडमॅप तयार करावा: किशोर टोंगे यांचे कुणबी मेळाव्यात प्रतिपादन

समाजाने विविध क्षेत्रातील नेतृत्वाचा पुढच्या पंचवीस वर्षाचा रोडमॅप तयार करावा: किशोर टोंगे यांचे कुणबी मेळाव्यात प्रतिपादन 

वरोरा: वरोरा तालुका धनोजे कुणबी समाजाच्या वतीने वरोरा येथे नुकताच वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उदघाट्न समारंभास उपस्थित असताना किशोर टोंगे यांनी समाजबांधवांसमोर भूमिका मांडली.

यावेळी बोलताना किशोर टोंगे म्हणाले की, आपला समाज हा कृषक समाज असून आज शेती संकटात असल्याने सर्वच संकटात आहे. त्यामुळे समाजाने पुढील 25 वर्षाचा रोडमॅप तयार करून विविध क्षेत्र काबीज करून त्यात आपला नावलौकिक वाढवावा. यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा व समाजाने संपूर्ण ताकदीनीशी या तरुणाई सोबत उभे राहावे  अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

आज जग झपाट्यानं बदलत असून समाजाने काळाची पावले ओळखून आधुनिक शेती सह उद्योग व्यापार, दर्जेदार शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य व संशोधन क्षेत्रात निर्माण होणाऱ्या संधी शोधून काम करावे. यासाठी समाज धुरीणांनी देखील पुढे येऊन काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

तसेच संस्थेने यासाठी पुढाकार घेऊन विवाह मेळाव्या बरोबरच यासाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी कुणबी समाज तालुका अध्यक्ष बोढाले, संयोजक बंडू देऊळकार, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार वामनराव चटप,  सुदर्शन निमकर व अन्य मान्यवर आणि मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.


Comments