वनोजा जवळ भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली; एक जागीच ठार, एक जखमी

वनोजा जवळ भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली; एक जागीच ठार, एक जखमी वरोरा, दि. 18 एप्रिल – येथील वनोजा गावाजवळ रात्री साडेनऊच्या सुमारास भरधाव व निष्काळजीपणे चालविलेल्या अज्ञात ट्रकने मोटारसायकलला समोरासमोर धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार चेतन किसनराव चावरे (वय ३६, रा. खौरी, ता. राळेगाव, जि. यवतमाळ) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले संदेश बुरडकर (वय ३५) जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन चावरे व संदेश बुरडकर हे मोटारसायकल (क्र. MH 36 D 5653) ने वरोराहून खौरीकडे जात होते. माढळीकडून वरोराकडे येणाऱ्या ट्रक चालकाने वेग व निष्काळजीपणा करून त्यांच्या बाईकला समोरून जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, चेतन चावरे यांचे डोके फुटून मेंदू बाहेर आला व त्यांचा मृत्यू झाला. जखमी संदेश बुरडकर यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृताचे काका विजय रामाजी क्षीरसागर (रा. दहेगाव) यांनी वरोरा पोलिसांत तोंडी रिपोर्ट दिला आहे. अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केलेल्या रस्त्याची एक वर्षातच लागली वाट*टेमूर्डा - जामणी बोपापुर मार्गावरील प्रकार *डब्ल्यूबीएम मध्ये वापरलेल्या साहित्यात सावळा गोंधळ

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केलेल्या रस्त्याची एक वर्षातच लागली वाट
*टेमूर्डा - जामणी बोपापुर मार्गावरील प्रकार 
*डब्ल्यूबीएम मध्ये वापरलेल्या साहित्यात सावळा गोंधळ

वरोरा : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून टप्पा क्रमांक -४ पीएमजीएसवाय -थ्री बॅच-१ सन २०२१-२२ अंतर्गत ५४५.६३ लाख रुपये खर्च करून टेमूर्डा-जामणी बु बोपापुर ९.५६ किलोमीटर रस्त्याच्या दर्जोन्नतीचे व त्यावरील पूल आणि नाल्यांचे काम केले होते. 
परंतु या कामात डब्ल्यूबीएम मध्ये वापरण्यात आलेल्या निकृष्ट साहित्यामुळे आणि डांबराच्या कमी थरामुळे  ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण झालेल्या या रस्त्याची मागील सहा महिन्यांपासून वाट लागली आहे. असा दर्जाहीन रस्ता तयार होत असताना संबंधित अधिकारी काय करत होते असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

 तसेच सदर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. परिणामी सदर कामाच्या चौकशीची मागणी केली जात आहे.
 वरोरा तालुक्यातील एमआरएल -०६ राष्ट्रीय महामार्ग ३४७(अ)‌ टेमूर्डा ते जामणी बु बोपापूर इंजिमा-०४ या  ९.५६ किलोमीटर रस्त्याच्या दर्जोन्नतीचे व त्यावरील ३ पूल आणि २७ मोरीचे बांधकाम नागपूर येथील एन एम पुगलिया यांना देण्यात आले होते. त्यांनी सदर काम २० ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू करून ते १९ ऑक्टोबर २०२२ रोजी पूर्ण केले होते .
भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून अर्थसहाईत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सदर काम झाले होते. यावर ८.९४ किलोमीटर  डांबरीकरण रस्ता व ०.६२० किलोमीटर सिमेंट रस्ता तयार करणे होते. तसेच या मार्गावर ३ पूल आणि २७ मोरीचे आणि ६०३ मीटर पक्की नालीचे बांधकाम करण्यात येणार होते. 
सदर काम शासनाने घालून दिलेल्या अटी व नियमानुसारच व्हायला हवी होते. परंतु सदर कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याने हा रोड खराब झाला आहे. 
भारत सरकारचे रोड बांधण्याबाबतचे फलक या ठिकाणी लागून आहे मात्र या फलकानुसार बरेचसे काम अपूर्ण असल्याचेही दिसून आले. 
त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची चौकशी करून अहवाल मागवावा ही मागणी जनतेकडून केली जात आहे. 
येणाऱ्या काळात जामणी रस्त्याचे दुरुस्ती करून न झाल्यास गावातील लोकांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

Comments