समाजसेवक बाबा आमटे यांच्या संकल्पनेतील भारत जोडो सायकल यात्रा अभियानाला ३६ वर्ष पूर्ण .

समाजसेवक बाबा आमटे यांच्या संकल्पनेतील भारत जोडो सायकल यात्रा अभियानाला ३६ वर्ष पूर्ण .

वरोरा दि 27 डिसेंबर
प्रवीण खिरटकर
       थोर समाजसेवक श्रध्देय श्रमर्षी बाबा आमटे यांच्या संकल्पनेतील भारत जोडो सायकल यात्रा अभियानाला जवळपास ३६ वर्ष पूर्ण झाली आहेत. १९८५ साली कन्याकुमारी ते काश्मिर व १९८९ साली अरूणाचल (इटानगर) ते गुजरात (ओखा) अशा दोन सायकल यात्रा, (१४ हजार कि.मी. प्रदास) नंतर पंजाबमध्ये पीस बाय पीसं मिशन अभियान व त्यापुढील प्रवास असे एकूण राष्ट्रीय एकात्मतेसाठी युवा-युवतींना सोबत घेऊन हे अभियान राबविल्या गेले व एक इतिहास घडला.
या भारत जोडो सायकल अभियानातील युवा-युवतींना एकत्र येऊन "बाबा आमटे एकता अभियान" ट्रस्ट नुकताच स्थापन केला आहे. बाबा आमटे यांच्या नावे राष्ट्रीय स्तरावर जीवनगौरव पुरस्कार व एक सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. जीवनगौरव पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असुन आदरणीय बाबा आमटे यांनी ज्या ज्या क्षेत्रात काम केले उदा. राष्ट्रीय एकात्मता, युवा, पर्यावरण रक्षण, कुष्ठसेवा, आरोग्यसेवा इ. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिंचा यथोचित सन्मान व्हावा म्हणुन हे पुरस्कार देण्याचे ठरले आहे.
         या वर्षी (२०२४) बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी तामिळनाडू, मदुराई येथील श्री. आर. सुंदरेसन (वय ८३ वर्ष) हे ठरले आहेत श्री. सुंदरेसन यांनी लहानपणापासून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विशेष करून अन्न सुरक्षेसाठी, राष्ट्रीय एकात्मता व आपत्कालीन व्यवस्थापन, पर्यावरण रक्षण इत्यादी क्षेत्रात अतुलनीय अशी कामगीरी केली आहे. त्यासाठी त्यांनी त्यांचे जीवन समर्पित केले आहे. आदरणीय बाबा आमटे यांनी राष्ट्रीय एकात्मता व सद्भावना यासाठी काढलेल्या कन्याकुमारी ते काश्मिर (१९८५) व इटानगर ते ओखा (१९८९) या दोन्ही सायकल यात्रेचे राष्ट्रीय समन्वयक म्हणुन अत्यंत मोलाची कामगिरी दोन्ही यात्रा यशस्वी करण्यात बजावली आहेत. १ लाख रूपये रोख, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मागिल वर्षी दिल्ली येथील जेष्त सर्वोदयी कार्यकर्ते व दक्षिया आशिया मैत्री अभियानाचे संयोजक तथा लोकसेवक संघाचे माजी सरचिटणीस श्री. सत्यपालजी ग्रोवर यांना गौरविण्यात आले होते.

बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार या पुरस्काराचे हे पहिले वर्ष असुन यासाठी मध्यप्रदेश जबलपूर परिसरातील बरगी धरणामुळे झालेल्या विस्थापितांचे पुर्नवसनासाठी मागील ३५ वर्षापासून संघर्ष व रचनात्मक कार्य करणारे कार्यकर्ते श्री. राजकुमार सिन्हा हे मानकरी ठरले आहे. भारत जोडो अभियान १९८९ अरूणाचल ते गुजरात या सायकल यात्रेत त्यांनी पूर्णवेळ म्हणजे ६ हजार कि.मी. सहभागी होऊन प्रवास केला आहे. आदरणीय बाबांच्या प्रेरणेनेच आपल्या आयुष्याचे कार्य म्हणुन त्यांनी हे कार्य स्विकारले आहे. संघर्ष व रचनात्मक काम याचा अनोखा संगम त्यांच्या कार्यातून दिसतो. या पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे.
वरील दोन्ही पुरस्काराचे मानकरी म्हणजे गांधी विचार, राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतीक सद्भावना, पर्यावरण रक्षण व संघर्षशिलता इत्यादी विचाराचा हा सन्मान आहे व आदरणीय बाबांनी आयुष्यभर जपलेल्या नीतीमूल्यांचा आणि रचनात्मक कार्याचा सन्मान होय असे समितीचे प्रांजळ मत आहे. वरील दोन्ही पुरस्कारांची घोषणा बाबा आमटे एकता अभियानाचे अध्यक्ष डॉ. विकास आमटे यांनी आज (२६ डिसेंबर २०२३, बाबांच्या १०९ व्या जयंतीदिनी) निवड समितीचे अध्यक्ष, व संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सोमनाथ रोडे व संस्थेचे सचिव डॉ. अशोक बेलखोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत केली.

वरील दोन्ही पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते आदरणीय बाबांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून म्हणजे ११ फेब्रुवारी २०२४ रोजी आनंदवन, वरोरा जि. चंद्रपूर येथे प्रदान करून पुरस्कर्त्यांना सन्मानित केले जाईल असे सचिव डॉ. अशोक बेलखोडे यांनी सांगितले या प्रसंगी कोषाध्यक्ष गिरीष पदमावार, सहसचिव नफिसा कोलंबोवाला, मुंबई सदस्य अनिल हेब्बार, मुंबई इत्यादी हजर होते.

Comments