वरोरा : भद्रावती आणि वरोरा तालुक्यातील बेरोजगारांसाठी ठाकरे गटाचे शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नोंदणी अभियान सुरू केले आहे.
दहावी- बारावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण तसेच कोणत्याही प्रकारची पदवी किंवा डिप्लोमा धारकांनी , वाहन चालकांनी १६ ऑगस्ट पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.
चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असून वरोरा आणि भद्रावती या दोन्ही तालुक्यात अनेक छोटे-मोठ्या कंपन्या आहेत. तसेच खाजगी व शासकीय कोळसा खाणी सुद्धा आहेत. असे असतानाही स्थानिक बेरोजगारांना या कंपन्यांमधून डावलले जात आहे. यामुळे वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील अनेक युवक पात्रता असतानाही बेरोजगार आहे. अशा बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी अनेक आंदोलने केली. त्यांच्या या आंदोलनाला बऱ्यापैकी यश लाभत आहे. यामुळे स्थानिक बेरोजगारांना न्याय देण्यासाठी त्यांची माहिती आपल्याला मिळावी या हेतूने शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांनी युवा सेनेचे नेते , माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बेरोजगार नोंदणी अभियान सुरू केले आहे. वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील इंजिनियर ,पॉलिटेक्निक, आयटीआय, कोणत्याही शाखेचा पदवीधर, दहावी, बारावी उत्तीर्ण - अनुत्तीर्ण किंवा हायवा, ट्रक, ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलेन चालक या सर्वांनी आपल्या पात्रतेच्या छायांकित प्रतीसह १६ ऑगस्ट २०२३ पर्यंत शिवसेना जिल्हा कार्यालय जुनी नगरपरिषद वरोरा येथे प्रत्यक्ष येऊन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment