राष्ट्रवादीचे नेते सुधाकर रोहणकर यांच्या नेतृत्वात आंदोलनाचा इशारा.
वरोरा ७जून२२
चेतन लूतडे
मागील काही दिवसापासून भद्रावती वरोरा ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिव्यांची लाईन विद्युत वितरण कंपनीने बंद केल्यामुळे ग्रामवासीयाना बऱ्याच अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
यासंदर्भात मंगळवारी ७ जूनला सकाळी सुधाकर रोहणकर यांच्या नेतृत्वात वरोरा येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी भद्रावती तालुक्यातील 65 ग्रामपंचायत मधील बरेच सरपंच उपस्थित होते. वरोरा येथील कार्यकारी अभियंता यांच्या सोबत याविषयी चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीने दोन महिन्याची थकबाकी १,५३,५५,१२८ रू थकीत बिल न भरल्याने पथदिव्यांची लाईन वरिष्ठांच्या आदेशानुसार कापण्यात आली असल्याची भूमिका सहाय्यक कार्यकारी अभियंता , वरोरा यांनी स्पष्ट केली.
त्यामुळे नाराज ग्रामपंचायतीच्या सरपंचानी महावितरण कंपनी व सरकार विरोधी भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत दोन दिवसांनी भव्य आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
ग्रामीण भागातील रात्रीचे पथदिवे बंद झाल्यामुळे जंगला लगतच्या गावांमध्ये हिंस्त्र पशूचा शिरकाव वाढला असून शेतीला जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रात्रीच्या चोरीमध्ये वाढ झाली असून शेतकऱ्यांचे बरेच अवजारे व जनावरे चोरीला जात आहे.
पावसाळा सुरू होताच साप विंचू मुळे जीवहानी झाल्यास महावितरण कंपनी जबाबदार असेल असे मत रोहणकर यांनी व्यक्त केले.
त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे बिल सरकारी फंडातून भरण्याची विनंती राष्ट्रवादीचे भद्रावती तालुकाप्रमुख सुधाकर रोहणकर यांनी केली. तोपर्यंत महावितरण कंपनीने पथदिव्यांची लाईन पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. येत्या दोन दिवसात महावितरण कंपनीने लाईन पूर्ववत न केल्यास भव्य आंदोलनाचा इशारा सर्व सरपंच व गावकरी लोकांनी दिलेला आहे.
Comments
Post a Comment