*शहरातील भगवान शंकराच्या मूर्तीची विटंबना*
वरोडा.: श्याम ठेंगडी
वरोडा शहरातील आठवडी भाजीबाजारात ३५ वर्षापूर्वी स्थापन केलेल्या भगवान शंकराच्या मूर्तीची बुधवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास अज्ञात इसमांनी विटंबना केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला असून या घटनेने खळबळ उडाली आहे .परिसरातील नागरिकांनी घटनेतील आरोपीस त्वरित अटक करण्याची मागणी केली असून योग्य कारवाई न केल्यास वरोडा बंद करण्याचा इशारा दिला आहे.
काल सायंकाळी या मूर्तीची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली. मूर्ती शेजारी एक दगड पडलेला असल्याचे दिसून आल्याने ही तोडफोड दगडाने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाल्यानंतर गणेश मधुकर शेंडे यांनी वरोडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.याप्रकरणी पोलीसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले
या घटनेमुळे पोलीसांनी त्वरेने हालचाल करीत चौकशीसाठी तीन
पथके तयार केली आहे पोलीसांनी आज गुरूवारला सकाळी दक्षता समितीची बैठक घेऊन सदस्यांना घटनेची माहीती दिली व परिस्थिती बिघडणार नाही याची यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
आठवडी बाजार परिसरातील नागरिकांनी यासाठी दहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समिती व परिसरातील नागरिकांनी पोलिस अधिका-यांची भेट घेऊन आरोपीस त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी केली असून अटक न केल्यास वरोडा बंद करण्याचा इशारा दिला आहे.
पोलीसांनी घेतलेल्या नागरिकांच्या बैठकीत भग्न झालेल्या मूर्तीचे विसर्जन करून नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची केलेली विनंतीस नागरिकांनी होकार दिला.
*भव्य मंदिर उभारणार*
घटनास्थळाला माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, नगरसेवक पंकज नाशिककर, अनिल साखरिया सेनेचे उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम आदींनी भेट देऊन परिसरातील नागरिकांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन केले.
अहेतेशाम अली यांनी या जागी लोकसहभागातून मंदिर उभारण्याची मांडलेला प्रस्ताव नागरिकांनी उचलून धरला. आता लवकरच मंदिराचे बांधकाम सुरु होणार आहे
Comments
Post a Comment