वरोर्यासाठी लवकरच नवी पाणीपुरवठा योजना ; आमदार करण देवतळे यांच्याकडून विकासकामांचा आढावा

वरोर्यासाठी लवकरच नवी पाणीपुरवठा योजना ; आमदार करण देवतळे यांच्याकडून विकासकामांचा आढावा

वरोरा, दि. २० एप्रिल २०२६: वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांनी आज नगर परिषद वरोरा येथे एका महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करून शहराच्या विकासाच्या दृष्टीने भरीव पाऊल उचलले. या बैठकीत आमदार देवतळे यांनी वरोरा शहराच्या पाणीपुरवठा योजनेला लवकरच मूर्त स्वरूप दिले जाणार असल्याची ग्वाही दिली. तसेच आमदार निधी व इतर स्त्रोतांमधून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

बैठकीत शहरवासीयांच्या दैनंदिन सुविधांशी संबंधित अनेक ज्वलंत मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण, वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजना, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरळीत पाणीपुरवठा करणे, नाल्यांची नियमित स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची देखभाल व स्वच्छता तसेच एकूणच शहर स्वच्छता अभियान अधिक प्रभावी करण्याबाबतच्या ठोस नियोजनावर चर्चा झाली.

नागरिकांना मूलभूत सुविधा सक्षमपणे व सुलभपणे मिळाव्यात तसेच शहरातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी यावेळी उपस्थित संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना आमदार श्री. देवतळे यांनी दिल्या. कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

या बैठकीला नगर परिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, नगराध्यक्षा अर्चनाताई ठाकरे, नगरसेवक, नगरसेविका तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनहित, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने ही आढावा बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.

...........

Comments