कर्जाच्या पैशांवरून पुतण्याने काकाला बांबूने मारहाण केल्याची तक्रार

  कर्जाच्या पैशांवरून पुतण्याने काकाला बांबूने मारहाण केल्याची तक्रार बातमी:warora वरोरा तालुक्यातील डोंगरगाव (खडी) येथे राहणारे नरेंद लटारी थेरे (वय 40, ड्रायव्हर) यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रार दिली आहे की, त्यांच्या पुतण्या प्रज्वल प्रमोद थेरे याने एक वर्षापूर्वी उसने घेतलेले 10,000 रुपये परत मागितल्याच्या रागातून त्यांना बांबूच्या काठीने मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. नरेंद यांच्या म्हणण्यानुसार, दि. 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या भावाच्या नंदोरी येथील घरी गेले असता, त्यांनी पुतण्याकडे पैसे परत मागितले. त्यावरून भांडण झाले आणि प्रज्वलने लाकडी काठी आणून त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, मांडीवर व हातावर प्रहार केले. दरम्यान, भाऊ आणि वहिनीने हस्तक्षेप करून काठी हिसकावून घेतली. मात्र, प्रज्वलने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे नरेंद यांनी सांगितले. पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. .................

भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संगम; भद्रावतीत ‘श्री सद्गुरू पादुका दर्शन व पूजन सोहळा’ उत्साहात संपन्न

भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संगम; भद्रावतीत ‘श्री सद्गुरू पादुका दर्शन व पूजन सोहळा’ उत्साहात संपन्न
भद्रावती : प्रतिनिधी
भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडवत *‘स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट’*च्या वतीने आयोजित ‘श्री सद्गुरू पादुका दर्शन व पूजन सोहळा’ दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात आध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले होते आणि पंचक्रोशीत भक्तिमय वातावरण पसरले होते.

या सोहळ्यास चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ (कीर्तीकुमार) भांगडिया तसेच वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे यांनी सपत्नीक उपस्थित राहून पादुकांचे दर्शन घेतले. याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी आमदार, अधिकारी, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणली.
कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ धार्मिक विधी न करता सामाजिक बांधिलकी जपत गरजू व उपेक्षित घटकांना मदतीचा हात देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. ‘मानवता धर्म’ जपण्याचा संदेश देत ट्रस्टने अनेक समाजोपयोगी उपक्रम साकारले. या अंतर्गत गरजू युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली, तर आरोग्य क्षेत्रात कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्णांना ‘बाबा आमटे आरोग्य अभियान’ अंतर्गत आर्थिक सहाय्य करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातही ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना’ तसेच ‘स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना’द्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून त्यांच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली.
याशिवाय ट्रस्टने ग्रामविकासाच्या दृष्टीने नंदोरी (बु) येथे स्वागत गेटसाठी सहकार्य केले असून माजरी येथील गरजू कुटुंबाला कठीण प्रसंगी मदत देत सामाजिक कर्तव्य पार पाडले. या सर्व उपक्रमांतून ट्रस्टने केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत असल्याचे दिसून आले.
गेल्या अनेक वर्षांपासून हा ट्रस्ट समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी कार्यरत असून, या सोहळ्याच्या माध्यमातून भक्तीच्या आनंदासोबतच सामाजिक ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करण्यात आला. भविष्यातही जनकल्याणाचे हे कार्य असेच सुरू ठेवण्याचा निर्धार ट्रस्टच्या वतीने व्यक्त करण्यात आला. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, समाजासाठी हा एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.
..........

Comments