महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर; खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या ‘आरक्षणाची गरज नाही’ विधानावर आमदार करण देवतळे यांचा कडाडून निषेध.

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर; 

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या ‘आरक्षणाची गरज नाही’ विधानावर आमदार करण देवतळे यांचा कडाडून निषेध.

वरोरा : १९/४/२६ लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित डिलीमिटेशन घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाले आहे. विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेली दोन तृतीयांश मते सरकारला मिळाली नाहीत. सरकारच्या बाजूने २९८ मते पडली तर विरोधात २३० मते पडली. विधेयक नामंजूर झाल्याचे लोकसभाध्यक्ष ओम बिरला यांनी स्पष्ट केले. यानंतर देशभर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर चंद्रपूर–आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेच्या पटलावर केलेले विधान वादात आले आहे. खासदार धानोरकर म्हणाल्या, "महिलांना आरक्षणाची गरज नाही. महिलांना शंभर टक्के आरक्षण असते. पुरुषांच्या जागेवरही महिला लढू शकतात. आम्ही पुरुषांच्या जागेवर लढून संसदेत आलो. आरक्षणाशिवाय इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्या. हे बिल खरोखर महिलांना अधिकार देणारे आहे का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
              खासदार प्रतिभाताई धनोरकर 

या वक्तव्यानंतर वरोरा विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार करण देवतळे यांनी संताप व्यक्त करत कडाडून टीका केली. देवतळे म्हणाले, "महिलांना आरक्षणाची गरज नाही, असे विधान एका महिला खासदाराकडून होणे हे अत्यंत दुर्दैवी, निंदनीय व आश्चर्यकारक आहे."

भाजपचा महिला सशक्तीकरणावर ठाम विश्वास असल्याचे सांगून ते म्हणाले, "जोपर्यंत महिलांना योग्य प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही, तोपर्यंत खरे महिला सशक्तीकरण होऊ शकत नाही. महिलांना आरक्षण देणे ही केवळ राजकीय बाब नसून सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे. देशाच्या विकासात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आरक्षण अत्यावश्यक आहे. महिलांना समान संधी व अधिकार मिळणे हे लोकशाहीचे मूलभूत तत्त्व आहे."

आमदार देवतळे यांनी धानोरकर यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत हे विधान महिला हिताच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.
..........................

Comments