दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत
रवीकमल कोटेक्स जिनिंग येथील घटना
वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.
आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले.
यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होत्या; मात्र कापसाच्या ढिगाऱ्यामुळे आग आटोक्यात येण्यास बराच विलंब लागला. या भीषण आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने शेतामध्ये सरपन जाळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असतात. अशातच एखादी छोटी चिंगारी उडून या आगीचे रूप धारण केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र आगीचे निश्चित कारण अजून पर्यंत स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तहसीलदार योगेश कोटकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष बकाल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नुकसानीचे नेमके पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Comments
Post a Comment