एकोणा खाण परिसरात चहा पिताना वाद; लाठीहल्ल्यात ट्रकचालक जखमी

एकोणा खाण परिसरात चहा पिताना वाद; लाठीहल्ल्यात ट्रकचालक जखमी.

कोळसा वाहनाचा नंबर लावण्यावरून वाद. खान प्रशासनाचे दुर्लक्ष

वरोरा, ता. ११ एप्रिल : वरोरा येथील एकोणा माईन्स गेट क्रमांक दोन येथे काल सकाळी अकरा वाजता चहा पिताना झालेल्या वादातून तिघांनी ट्रकचालक सूर्यप्रतापसिंग कृष्णगोपाल सिंग (वय २५, रा. बिलघाडी, ता. गूनोर, जि. पन्ना, मध्यप्रदेश) यांच्यासह चार जणांवर लाठीने हल्ला केला. या हल्ल्यात सूर्यप्रतापसिंग यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, हाताला सूज आली आहे. पोलिसांनी मनोजकुमार चंद्रवंशी, सन्नीकुमार चंद्रवंशी व सहँदरकुमार बंशी या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम  ११८(१),(२), ३५१,३५२ व जीवे मारण्याच्या धमकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी सूर्यप्रतापसिंग यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आदल्या दिवशी सकाळी चार वाजता कोळसा वाहनाचा नंबर लावण्यावरून या आरोपींनी त्यांच्या साथीदार विवेक हरीसिंग याला मारहाण केली होती. ती बोलण्यासाठी सूर्यप्रतापसिंग हे आपल्या चार साथीदारांसह गेले असता, आरोपींनी कोणतीही चौकशी न करता हातातील लाकडी दांड्याने थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. मनोजकुमार चंद्रवंशी याने दांड्याने सूर्यप्रतापसिंग यांच्या डाव्या हातावर मारले. तसेच त्याच दांड्याने त्यांच्यासोबतच्या शुभम कृष्णपाल सिंग, शत्रूघन विश्वनाथ सिंग, विवेक हरीसिंग व विपीन ध्यान सिंग यांच्या हातापायावर व पाठीवर मारहाण केली. आरोपींनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीही दिली. घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून फिर्यादीचा वैद्यकीय अहवाल मागवला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

Comments