मतदार यादीतून स्थलांतरित व बोगस नावे वगळणार; प्रत्येक बूथवर शिवसेनेचे BLA सक्रिय राहणार – आमदार कृपाल तुमाने


मतदार यादीतून स्थलांतरित व बोगस नावे वगळणार; प्रत्येक बूथवर शिवसेनेचे BLA सक्रिय राहणार – आमदार कृपाल तुमाने

वरोरा, दि. १० – शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार कृपाल तुमाने यांच्या अध्यक्षतेखाली वरोरा येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाप्रमुख नितीन मते, जिल्हा संघटक मुकेश जीवतोडे, भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल चटकी, महिला जिल्हा प्रमुख  प्रतिमा ठाकूर, युवा नेते हर्षल शिंदे व आलेख रट्टे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीत बऱ्याच युवकांसह सुमठाणा येथील सरपंच शुभांगी दातारकर यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यात आला.

आमदार तुमाने यांनी मतदार यादीच्या शुद्धीकरणावर भर देताना स्पष्ट केले की, जे लोक प्रत्यक्ष वार्डात राहतात त्यांचीच नावे मतदार यादीत असणे आवश्यक आहे. स्थलांतरित झालेल्या नागरिकांची नावे यादीतून वगळण्यात येणार असून बोगस नावे हटवण्याची कारवाई निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरावलोकन कार्यक्रमाद्वारे (SIR) करण्यात येणार आहे. या कामी शिवसेनेचा प्रत्येक बूथ लेव्हल एजंट (BLA) सक्रिय सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.

परिसीमनानंतर 33 टक्के मतदारसंघ वाढणार असल्याने महिलांच्या राजकारणातील सहभागात लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास आमदार तुमाने यांनी व्यक्त केला. याचा थेट फायदा चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना होणार असून शिवसैनिकांनी बूथ रचनेपासूनच योग्य तयारी सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आमदार तुमाने यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर जिल्हाप्रमुख व जिल्हा संघटक  यांच्यासोबत सखोल चर्चा करण्यात आली.


Comments