कर्जाच्या पैशांवरून पुतण्याने काकाला बांबूने मारहाण केल्याची तक्रार

  कर्जाच्या पैशांवरून पुतण्याने काकाला बांबूने मारहाण केल्याची तक्रार बातमी:warora वरोरा तालुक्यातील डोंगरगाव (खडी) येथे राहणारे नरेंद लटारी थेरे (वय 40, ड्रायव्हर) यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रार दिली आहे की, त्यांच्या पुतण्या प्रज्वल प्रमोद थेरे याने एक वर्षापूर्वी उसने घेतलेले 10,000 रुपये परत मागितल्याच्या रागातून त्यांना बांबूच्या काठीने मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. नरेंद यांच्या म्हणण्यानुसार, दि. 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या भावाच्या नंदोरी येथील घरी गेले असता, त्यांनी पुतण्याकडे पैसे परत मागितले. त्यावरून भांडण झाले आणि प्रज्वलने लाकडी काठी आणून त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, मांडीवर व हातावर प्रहार केले. दरम्यान, भाऊ आणि वहिनीने हस्तक्षेप करून काठी हिसकावून घेतली. मात्र, प्रज्वलने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे नरेंद यांनी सांगितले. पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. .................

2011 पुर्वीच्या अतिक्रमणधारकांना प्राधान्याने जागेचा मालकी हक्क द्या पालकमंत्र्यांनी दिले यंत्रणांना निर्देश

2011 पुर्वीच्या अतिक्रमणधारकांना प्राधान्याने जागेचा मालकी हक्क द्या  

 पालकमंत्र्यांनी दिले यंत्रणांना निर्देश

चंद्रपूर, दि. 24 : अनेक वर्षांपासून वास्तव्य असलेल्या अतिक्रमणधारकांना दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार 1 जानेवारी 2011 पुर्वी असलेले अतिक्रमण नियमानुकूल करून संबंधितांना जागेचा मालकी हक्क द्यायचा आहे. या धोरणात्मक निर्णर्याची चंद्रपूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून 2011 पुर्वीचा कोणताही पात्र लाभार्थी घराच्या / जागेच्या मालकी हक्कापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, संदीप भस्के उपजिल्हाधिकारी (जमीन) सचिन कुमावत, अतुल जटाळे (पुनर्वसन) यांच्यासह दूरदृष्यप्रणालीने सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगर पालिका आणि नगर पंचायतीचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

अतिक्रमण नियमानुकुल करण्याची प्रक्रिया 2017 पासून सुरू झाली आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, यात सुधारणा करून अतिक्रमणधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 25 मार्च 2026 रोजी अद्ययावत शासन निर्णय काढला आहे. त्यानुसार 2011 पूर्वीच्या पात्र अतिक्रमीत लाभार्थ्यांना नियमानुकूल करून घराचा / जागेचा मालकी हक्क प्रदान करण्यात येईल.

ग्रामस्तरावरील यंत्रणेने यासाठी नागरिकांपर्यंत पोहचावे. लोक आपल्याकडे येतील, याची वाट पाहू नये. गावातील कोणताही पात्र लाभार्थी मालकी हक्कापासून वंचित राहणार नाही, याची यंत्रणेने काळजी घ्यावी. सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना त्वरित सूचना द्याव्यात. वनजमीन वगळता गायरान आणि महसुलीच्या जागेवर अतिक्रमण असेल तर नियमानुकूल करणे आवश्यक आहे, असेही पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले.

बळीराजा शेतपाणंद रस्त्यांचा आढावा : बळीराजा शेतकरी पाणंद रस्त्यासाठी स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. आपापल्या क्षेत्रातील पाणंद रस्त्यांबाबत त्वरीत आढावा घेऊन किती किलोमीटरचे पाणंद रस्ते तयर करावयाचे आहे, त्याचे नियोजन कसे केले, याची माहिती द्यावी. पावसाळ्यापूर्वी प्रत्येक मतदारसंघात पांदण रस्ते तयार व्हावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

०००००

Comments