मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ता, पूल नाही म्हणून वंचित!कारेगाव-पारोधी रोड बांधकामाचा फायदा नाही, नालेपलीकडे शेतकरी अडले.
कारेगाव-पारोधी रोड बांधकामाचा फायदा नाही, नालेपलीकडे शेतकरी अडले
वरोरा
चेतन लूतडे
वरोरा-भद्रावती-मानोरा : मुख्यमंत्री ग्राम सडक योजना (CMGSY) अंतर्गत कारेगाव ते पारोधी येथील चार किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यात आलेला असून त्यावर लाखो रुपये खर्च झाले आहेत. मात्र, याच रस्त्यावरील एक नाल्यावरचा पूल अजून बांधला गेला नसल्याने शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना आजही जाण्यायेण्यासाठी मोठी अडचण सोसावी लागत आहे. पूल नसल्यामुळे हा रस्ता व्यवहार्य ठरलेला नाही आणि शासनाच्या या योजनेचा उद्देशच फोल ठरला आहे.
स्थानिक उपसरपंच यांनी या संदर्भात खंत व्यक्त करत म्हटले आहे, “शासनाने मोठा रस्ता बांधला, पण पूल नाही, तर या रस्त्याचे काय उपयोग? गावकरी सिंचनासाठी, बाजारासाठी, दळणवळणासाठी अडकून पडले आहेत. या रस्त्याचा पूल हा गावाला जीवनरेषेप्रमाणे आहे, पण त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.”
या भागातील शेतकरी म्हणतात, “पावसाळ्यात नाला भरला की परिसर पूर्णपणे तुटतो. रस्ता असूनही आम्ही जुनीच वाट वापरावी लागते. सरकारी योजनेचा हा मोठा विसंगतीपूर्ण प्रकार आहे.”
या व्यतिरिक्त, गावात अनेक मूलभूत सोयी जसे की सिंचन व्यवस्था, पाण्याची टाकी, इतर जोडरस्ते इत्यादी कामे अजूनही अपूर्ण आहेत, ज्यामुळे गावकरी विकासापासून कोसो दूर राहिले आहेत. अनेक वर्षांपासून हे प्रश्न स्थानिक प्रशासनापुढे मांडले जात असले, तरी कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांनी याकडे गंभीर लक्ष दिलेले नाही.
स्थानिक नागरिक आता मागणी करीत आहेत की, या रस्त्यासोबत पूल बांधण्याचे काम तातडीने सुरू करावे आणि गावातील इतर मूलभूत समस्याही लवकरात लवकर सोडवण्यात याव्यात. त्यांनी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री कार्यालयाकडेही लक्ष वेधण्याचा आग्रह धरला आहे.
Comments
Post a Comment