*चंद्रपूर काँग्रेसमधील 'त्या' २ टक्क्यांच्या सुभेदारीचा अंत करा**विधवा महिला खासदाराचे खच्चीकरण करणाऱ्या 'बांडगुळांना' धडा शिकवण्याची वेळ*
*विधवा महिला खासदाराचे खच्चीकरण करणाऱ्या 'बांडगुळांना' धडा शिकवण्याची वेळ*
चंद्रपूर: ज्या नेत्याने शून्यातून विश्व निर्माण करून चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला संजीवनी दिली, त्या दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या पश्चातही त्यांच्या कुटुंबाचा छळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. ज्यांच्या रक्तातच 'बहुजन द्वेष' आहे, असे स्वपक्षातील 'दोन टक्के' स्वयंघोषित नेते आजही खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गात काटे पेरण्याचे नीच राजकारण करत आहेत. बाळूभाऊ हयात असताना ज्या प्रवृत्तींनी त्यांना त्रास दिला, तीच टोळी आता एका विधवा महिलेचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी सरसावली आहे.
स्वपक्षातूनच प्रचंड विरोध आणि अंतर्गत गद्दारी होत असतानाही, प्रतिभाताई धानोरकर यांनी देशात दुसऱ्या क्रमांकाचे २ लाख ५० हजारांचे विक्रमी मताधिक्य घेऊन विरोधकांचे दात घशात घातले. केवळ लोकसभाच नव्हे, तर जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसचा झेंडा रोवून त्यांनी आपली ताकद सिद्ध केली. जनतेने कौल देऊनही, स्वतःला 'महानेते' समजणाऱ्या या दोन टक्के नेत्यांचा अहंकार अजूनही शमत नसल्याने ते आता खालच्या पातळीवर उतरून जिल्ह्याचे राजकारण गढूळ करत आहेत.
चंद्रपूर महानगरपालिकेत २७ नगरसेवकांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असताना, या 'बांडगूळ' नेत्याने गटबाजीचे विष पेरून पक्षाचे वाटोळे सुरू केले आहे. स्वतःच्या गटाची संख्या वाढवण्यासाठी दुसऱ्या गटाचे चक्क ५ नगरसेवक पळवण्यापर्यंत या नेत्याची मजल गेली आहे. काँग्रेसचे खच्चीकरण करण्यासाठी आणि प्रतिभाताईंची कोंडी करण्यासाठी हे नेते भाजपशी हातमिळवणी करायलाही मागेपुढे पाहत नाहीत, हे आता लपून राहिलेले नाही. ही जिल्ह्याच्या राजकारणाला लागलेली मोठी कीड आहे.
महाराष्ट्र हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आहे, मात्र एका १००% ओबीसी असलेल्या विधवा लोकप्रतिनिधीला केवळ स्वतःची राजकीय दुकानदारी टिकवण्यासाठी त्रास देणे, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. चंद्रपूर हे कार्यक्षेत्र नसतानाही येथे लुडबूड करून बहुजन नेतृत्वाची गळचेपी करणाऱ्या या प्रवृत्तींचा 'मुखवटा' आता बहुजन समाजाने फाडण्याची वेळ आली आहे. बाळूभाऊंच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना आता चंद्रपूरकर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.
........
Comments
Post a Comment