राहुल जानवे यांच्या प्रवेशाने राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता ,जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांच्या उपस्थितीतपक्षप्रवेश



राहुल जानवे यांच्या प्रवेशाने राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता

जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांच्या उपस्थितीत
पक्षप्रवेश

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरोरा भद्रवती येथील नगरपालिकेतील राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने (मशाल चिन्ह) येथे सर्व १३ प्रभागांमध्ये उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतल्याने पक्षातील उमेदवारांसाठी एबी फॉर्म मिळवण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. तथापि, माजी नगर उपाध्यक्ष राहुल जानवे यांच्या शिवसेनेत झालेल्या पक्षप्रवेशाने निवडणूकीची समीकरणे पालटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या चळवळीमुळे पक्षाला नगराध्यक्षपदासाठी मजबूत दावेदारी करता येणार आहे. ताजणे यांनी पक्षाची रचना मजबूत करण्यासाठी स्थानिक नेत्यांसोबत चर्चा देखील सुरू केल्या आहेत.

राहुल जानवे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांच्या प्रभावाचा फायदा पक्षाला मिळू शकतो. शहरातील इच्छुक उमेदवार आता जानवे यांच्या नेतृत्वाखाली येत आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या राजकीय बदलामुळे निवडणुकीपूर्वीचे समीकरण ढवळून निघाल्याचे दिसत आहे.

या सर्व घडामोडीमुळे वरोरा नगरपालिका निवडणुकीत उद्धव गटाची शिवसेना एक प्रबळ भूमिका घेणार आहे, असे सूचित होते. निवडणूकीच्या दिवसांजवळ येता राजकीय आघाड्यांवर होणाऱ्या बदलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल जानवे व सीमा किशोर नरवाडे  यांचा प्रवेश घेण्यात आला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी विधानसभा प्रमुख बंडूभाऊ डाखरे, विधानसभा समन्वयक पंकज नाशिककर, उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


Comments