दूषित पाणी पुरवठ्यामुळे ४ वर्षीय मुलाचा मृत्यू; कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल

दूषित पाणी पुरवठ्यामुळे ४ वर्षीय मुलाचा मृत्यू; कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल

वरोरा, ०६/०७/२०२४ - वरोरा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठ्यातील लापरवाहीमुळे दूषित पाणी पिण्यामुळे ४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप असून, कंत्राटदार कंपनीविरुद्ध पोलीस स्टेशन वरोरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर पोलीस स्टेशनकडून ०७/०७/२०२४ रोजी वरोरा पोलीस स्टेशनला पुर्वेश सुभाष वांढरे (वय ४ वर्षे, राहणार मालवीय वॉर्ड, वरोरा) यांच्या मृत्यूच्या तपासाबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार वरोरा पोलीस स्टेशनवर मृत्यू क्रमांक ८४/२४ कलम १९४ भा.ना.सं. प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सोपनी उमेश नासरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व साक्षीदारांचे बयान नोंदविले. तसेच घटनास्थळावरील पाण्याचे नमुने पंचासमक्ष जप्त करून न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, चंद्रपूर येथे पाठविले. मृत बालकाचा पोस्टमॉर्टेम अहवालही मिळविण्यात आला.

प्रयोगशाळेच्या अहवालानुसार (जि.आ.प्र.शा/अणु/४५४८/४९ दि. १६/०७/२०२४) जप्त केलेले पाणी पिण्यायोग्य नाही, असे निष्कर्ष आले. तसेच, सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथील शवविच्छेदन केंद्राच्या अहवालात (ऑटॉप्सी सर्जन) विषाचा पत्ता लागल्याचे आढळले नाही. तथापि, शवविच्छेदन अहवालात (ऑटॉप्सी सर्जन) मृत्यूचे कारण 'कर्ब्रोपल्मोनरी एडिमा (मस्तिष्क व फुफ्फुसात द्रव साचणे) आणि प्रकरण गॅस्ट्रोएंटेरायटिस (जुलाब व उलट्या) यासंदर्भातील असल्याचे' नमूद केले आहे.
एकूणच, ०६ जुलै २०२४ रोजी मध्यरात्री १२.३० वाजता मालवीय वॉर्ड, वरोरा येथे झालेल्या ४ वर्षीय पुर्वेश वांढरे यांच्या मृत्यूचे कारण नगरपरिषदेच्या नळातून पुरविले जाणारे दूषित पाणी हे असून, यामागे पाणीपुरवठ्याचा कंत्राटदार म्हणून काम करणाऱ्या 'विदर्भ मल्टीसर्विसेस, वरोरा' या कंपनीची लापरवाही असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, वरोरा यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वरोरा येथे 'विदर्भ मल्टीसर्विसेस, वरोरा' यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक १६/२६ कलम २७१, १०६ (१) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सोपनी गणेश मोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

वरोऱ्यामध्ये शुद्ध पाणीपुरवठा कधी होणार?

त्यामुळे वरोरा नगरपालिकेमधील शुद्ध पाणीपुरवठा योग्य नसल्याचे सबळ पुरावे संबंधित प्रशासनानेच दिल्याने आता तरी नगरपालिका युद्ध स्थळावर पाणीपुरवठा योजना मंजूर करून वरोऱ्यातील नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची सेवा देणार की नाही हा मोठा प्रश्न आहे? जनतेने शुद्ध पिण्याच्या पाण्याचा कर का भरावा असाही प्रश्न या संदर्भात उभा राहिला आहे. ज्या लोकांनी नळाचे कनेक्शन काढलेले आहे. त्यांचा कर बंद करावा ही विनंती पालिकेकडे केली आहे. या कंपनीला देण्यात आलेले सर्व कंत्राट रद्द करणार काय असे बरेच प्रश्न अनुत्तरीत आहे. 



Comments