*प्रजासत्ताक दिनानिमित्त दहेगाव ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम**लोकवर्गणीतून शाळा व अंगणवाडीसाठी एक लाखांचे अर्थसहाय्य*
*लोकवर्गणीतून शाळा व अंगणवाडीसाठी एक लाखांचे अर्थसहाय्य*
वरोडा :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया अधिक भक्कम व्हावा आणि त्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात या उद्देशाने देहगाव ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे (२६ जानेवारी) औचित्य साधून एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला ८० हजार रुपये तर अंगणवाडीला २० हजार रुपये असे एकूण १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र व राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी एकत्र येत उत्स्फूर्तपणे या लोकवर्गणीत सहभाग नोंदविला.
आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व अद्ययावत शिक्षणाची गरज आहे. या अर्थसहाय्यातून शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून आर्थिक अडचणीमुळे शिक्षणात अडथळे येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनाही याचा मोठा लाभ होणार आहे.
अनेकदा ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांना शहरातील खासगी शाळांमध्ये प्रवेश देतात. मात्र, दहेगाव ग्रामपंचायतीच्या या पुढाकारामुळे आता जिल्हा परिषद स्थानिक शाळाच सक्षम व आकर्षक ठरणार असून शहरी शाळांच्या तोडीस तोड सुविधा गावातच उपलब्ध होतील. त्यामुळे शहराकडे वळलेला विद्यार्थी वर्ग पुन्हा जिल्हा परिषद शाळेकडे आकर्षित होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत दहेगावचे सरपंच विशाल नानाजी पारखी, उपसरपंच महेश विश्वनाथ सोनटक्के, ग्रामपंचायत सदस्य विशाल पंढरी डाहूले, कविता पंढरी घुगव, चित्रा नानाजी गोखरे, गायत्री विजय मेश्राम, रूपाली टाले, रंजना वाभीटकर यांचेसह शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला जीवतोडे, शाळा समितीचे अध्यक्ष गजानन चिडे, उपाध्यक्ष आरती परचाके, सदस्य मंगेश सोनटक्के,सुरेश मेश्राम,मंजुषा चवले, भाग्यश्री गोखरे,पोलीस पाटील शारदा ढवळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष विठ्ठलराव बोधणे, दहेगाव सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विलासराव ढगे, आरोग्य सेविका दखणे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
शासकीय निधीची वाट न पाहता केवळ राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने लोक वर्गणीतून शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करण्याचा दहेगाव ग्रामपंचायत तिचा हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरत असून इतर गावांनाही शिक्षणाप्रती अशीच जागृती निर्माण करण्यास प्रेरणादायी ठरेल असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment