ग्रामसेवकाविरुद्ध कारवाईची मागणीअर्जुनी तुकूम ग्रामपंचायतीत ७-८ महिने प्रोसिडिंग बुक न भरल्यामुळे सभेत गोंधळ; ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी

ग्रामसेवकाविरुद्ध कारवाईची मागणी
अर्जुनी तुकूम ग्रामपंचायतीत ७-८ महिने प्रोसिडिंग बुक न भरल्यामुळे सभेत गोंधळ; ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी


वरोरा, ता. २७ जानेवारी २०२६ – वरोरा तालुक्यातील अर्जुनी तुकूम ग्रामपंचायतीत आयोजित मासिक सभेदरम्यान ग्रामसेवकाने गेल्या सात-आठ महिन्यांपासून प्रोसिडिंग बुक भरले नसल्याचे उघडकीस आल्यामुळे सभेत गोंधळ निर्माण झाला. ग्रामसेवकाविरुद्ध लगेच कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य जगदीश पेंदाम यांनी व गावकऱ्यांनी पंचायत समिती संवर्ग गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

सभेदरम्यान ग्रामपंचायत सदस्य जगदीश पेंदाम यांनी प्रोसिडिंग बुक तपासत असताना लक्षात आले की, जून २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत झालेल्या कोणत्याही कामाचा किंवा रुपयांच्या खर्चाचा तपशील बुकमध्ये नोंदवलेला नाही. याबाबत ग्रामसेवकांना विचारणा करता, "मला वेळ नव्हता म्हणून बुक भरले नाही," असे त्यांनी उत्तर दिले.

या प्रतिसादामुळे सभेत उपस्थित गावकरी नाराज झाले व वातावरण तणावग्रस्त बनले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना बोलावण्यात आले. त्यानंतर जगदीश पेंदाम यांनी सभेमध्ये उपस्थित पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी व गावकऱ्यांच्या समक्ष ते प्रोसिडिंग बुक लिफाफ्यात सीलबंद करून वरोरा पंचायत समिती संवर्ग गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपवले.

जगदीश पेंदाम यांनी नमूद केले की, "ग्रामसेवक हे शासनाचे प्रशासकीय अधिकारी आहेत. सात-आठ महिने प्रोसिडिंग बुक न भरणे ही गंभीर गैरवर्तनू आहे. यामागे कोणताही हितसंबंध दडलेला नसेल ना? याबाबत त्वरित चौकशी व्हावी आणि ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी."

गावकऱ्यांसह पेंदाम यांनी पंचायत समिती संवर्ग गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून ग्रामसेवकाचे तातडीने निलंबन करण्याची मागणी केली आहे. आता गटविकास अधिकारी या तक्रारीवर योग्य कारवाई करतील की नाही, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments