६० लाखांचा डांबरी रस्ता एका वर्षातच उखडला; गावकरी आणि पर्यटक त्रस्त.शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याची भूमिका

६० लाखांचा डांबरी रस्ता एका वर्षातच उखडला; गावकरी आणि पर्यटक त्रस्त.

शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याची भूमिका

शेगाव: सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खनिज विकास निधीतून ६० लाख रुपये खर्चून शेगाव-दादापूर-धानोली या डांबरी रस्त्याचे काम गेल्या वर्षी (२०२३-२४) करण्यात आले होते. मात्र, केवळ एका वर्षाच्या आतच या रस्त्याची दुरावस्था झाल्याने गावकरी आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे जाणारे पर्यटक त्रस्त झाले आहेत.

या रस्त्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे गावकर्यांनी आरोप केले आहे. रस्ता उखडलेला असल्यामुळे वाहतूक खडतड होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. शेतकरी आणि स्थानिक नागरिक दैनंदिन जाणे-येणे करताना मनस्ताप सहन करत आहेत.

गावकरी आणि लोकप्रतिनिधींनी या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करून, संबंधित करारदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी कॉन्ट्रॅक्टदाराला 'काळ्या यादीत' टाकण्याची मागणी केली आहे.

हे रस्ते ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडे जाणारा एक महत्त्वाचा मार्ग असल्याने, त्याच्या दुरावस्थेमुळे पर्यटकांनाही खडतड प्रवास करावा लागत आहे.

सध्या, या उखडलेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी नवीन निधी मागण्यात आला असून, आता दादापूर ते चारगाव हा नवा रस्ता बांधण्याची योजना आहे अशी माहिती मिळाली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित झाल्याने, नवीन योजनेबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे.
एक वर्षाच्या आत रोड जर खराब होत असेल तर रोडचा दर्जा तपासण्याची गरज आहे. संबंधित विभागाकडे पाच वर्षासाठी सेक्युरिटी डिपॉझिट असते. त्यामुळे तो रस्ता नव्याने दुरुस्त करण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल तात्काळ घ्यावी अन्यथा शिवसना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी दिला आहे.
********************
***********

Comments