स्थानिक नेतृत्वाच्या दडपशाहीला कंटाळून युवा सेनेच्या ताकदवान नेत्याचा तडकाफड राजीनामा; उद्धव ठाकरे गटात खळबळ

स्थानिक नेतृत्वाच्या दडपशाहीला कंटाळून युवा सेनेच्या ताकदवान नेत्याचा तडकाफड राजीनामा; उद्धव ठाकरे गटात खळबळ

चंद्रपूर 
प्रतिनिधी 

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत गटबाजी, दडपशाही आणि स्थानिक नेतृत्वाच्या व जिल्हा संपर्ककाच्या हुकूमशाही वृत्तीचा आणखी एक बळी समोर आला असून, युवा सेनेचे पूर्व विदर्भ सचिव तथा गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य इंजि. निलेश बेलेखेडे यांनी आपल्या पदाचा तडकाफड राजीनामा देत पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. या राजीनाम्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मोठी खळबळ उडाली असून, विदर्भातील संघटनात्मक अपयश पुन्हा एकदा उघड झाले आहे.

पक्षासाठी निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि संघर्षाच्या भूमिकेतून काम करणाऱ्या निलेश बेलेखेडे यांना पक्षश्रेष्ठींकडून सातत्याने धमकावणे, दबाव टाकणे आणि बळजबरीने निर्णय लादण्याचे प्रकार सहन करावे लागले. पक्षसंघटन मजबूत करण्याऐवजी जी..हूजूरी करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे धोरण आणि प्रश्न उपस्थित करणाऱ्यांची गळचेपी करण्याची वृत्ती यामुळे अखेर त्यांनी हा कठोर निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

निलेश बेलेखेडे हे केवळ पदाधिकारी नव्हते, तर विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी प्रश्न, प्राध्यापकांचे थकीत वेतन, शैक्षणिक अन्याय याविरोधात त्यांनी थेट शासन दरबारी संघर्ष उभारला. विशेष म्हणजे मॉडर्न कॉलेजमधील प्राध्यापकांचे थकीत वेतन त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतरच मिळाले, ही बाब त्यांच्या कार्यक्षमतेची साक्ष देते.

विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर आवाज उठवणाऱ्या नेत्याला पक्षात सन्मान मिळण्याऐवजी अडचणीत आणले गेले, ही बाब पक्षातील लोकशाही प्रक्रियेचा फोलपणा अधोरेखित करते. आदित्य ठाकरे यांचे अतिशय निकटवर्तीय आणि विदर्भातील युवा सेनेच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेल्या नेत्याने राजीनामा देणे म्हणजे पक्षासाठी गंभीर इशारा असल्याचे राजकीय अभ्यासक सांगतात.
या राजीनाम्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विदर्भात मोठी संघटनात्मक पोकळी निर्माण झाली आहे. युवकांमध्ये प्रभाव असलेले, समाजाशी थेट जोडलेले आणि प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे नेतृत्व पक्षातून बाहेर पडल्याने अनेक युवा सेनेचे पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत.

दरम्यान, नुकतीच विदर्भ तेली समाज महासंघाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी निलेश बेलेखेडे यांची नियुक्ती झाली असून, समाजकारणातही त्यांचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे आता ते कोणत्या राजकीय वाटेवर जाणार, कुठल्या पक्षात प्रवेश करणार, याकडे संपूर्ण विदर्भातील युवकांचे लक्ष लागले आहे.

एकंदरीत, पक्षश्रेष्ठींच्या हुकूमशाही, दडपशाही आणि कार्यकर्त्यांच्या अपमानजनक वागणुकीमुळे उद्धव ठाकरे गटातील आणखी एक ताकदवान युवा नेता बाहेर पडला असून, हा राजीनामा येत्या काळात पक्षासाठी मोठी डोकेदुखी ठरणार, हे मात्र नक्की.

....


Comments