वरोरा येथे प्रतिबंधित नायलॉन मांज्याचा साठा जप्त; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
चंद्रपूर, दिनांक १२ डिसेंबर २०२५:
पोलीस स्टेशन वरोरा हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने गुप्त माहितीवर आधारित कारवाई करून प्रतिबंधित नायलॉन मांज्याचा मोठा साठा जप्त केला आहे. कारवाई दरम्यान वरोरा येथील सौ. गीता तुळशीदास पानघाटे (वय ४०, निवासी आझाद वार्ड, वरोरा) या महिलेच्या दुकानात पंचासमक्ष झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा, मानवी जीविताला आणि पर्यावरणास धोकादायक असलेला ४५ नग नायलॉन मांजा (प्लास्टिक चक्री) जप्त करण्यात आला, ज्याची अंदाजित बाजार किंमत सुमारे ५४,००० रुपये आहे.
पोलीस उपनिरीक्षकांनी सांगितले की, हा माल अवैधरीत्या विक्रीसाठी साठवला होता. तपासादरम्यान आरोपी गीता पानघाटे यांनी हा नायलॉन मांजा वरोरा येथील हकिमुद्दीन हुसेन नावाच्या व्यक्तीकडून मिळवल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे नायलॉन मांजा ताब्यात ठेवणारी आणि त्याचा पुरवठा करणारी दोघेही आरोपी असल्याचे दिसून आले आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन वरोरा येथे आरोपीविरुद्ध भा.नि.सं. २२३, २९२, ४९ बी.एन.एस. सह कलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी हकिमुद्दीन हुसेनचा शोध आणि त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस तपास चालू आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस पथक वरोरा, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment