डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षा दिनाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची मागणी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षा दिनाला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची मागणी.


चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरनंतर चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली व सामाजिक क्रांतीचा नवा अध्याय रचला. हा दिवस बौद्ध समाजासाठी तसेच सामाजिक समतेच्या विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी मानला जातो.
दरवर्षी या दिवशी देशभरातून लाखो आंबेडकरी बांधव आणि बौद्ध धर्मीय चंद्रपूरच्या या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमतात. मात्र, या पवित्र दिवशी सार्वजनिक सुट्टी नसल्यामुळे अनेकांना इच्छा असूनही सहभागी होता येत नाही. शासकीय, निमशासकीय तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या दिवशी रजा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.

या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विभागीय आयुक्तांकडे १६ ऑक्टोबर हा दिवस चंद्रपूर जिल्ह्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या ऐतिहासिक दीक्षा दिनाचे महत्त्व लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना या दिवसाचा सन्मान करता यावा यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांना दीक्षाभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे सुलभ होईल असे म्हटले जात आहे.

Comments