चेतन लूतडे
आज (दि.३० सप्टेंबर), चंद्रपूर शहरात नागपूर रोड लगत एक सुखद चित्र बघायला मिळाले. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृहात जिल्हा बँकेच्या वार्षिक आमसभेकरीता संपूर्ण जिल्हाभरातून आलेले विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी येताना तर दरवर्षीप्रमाणेच आले. मात्र सभागृहात आल्यानंतर व जाताना एक अनोखे दृश्य बघायला मिळाले. हे दृश्य बघताना खऱ्या अर्थाने बोध होत होता की, चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती कार्यरत आहे....
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभागृहात उपस्थित सर्व संचालक मंडळ व जिल्ह्यातून आलेले सर्व सहकारी संस्थांचे प्रतिनिधी गुरुदेव सेवा मंडळाचे प्रतीक असलेली भगवी टोपी परिधान करुन व हातात ग्रामगिता घेऊन असल्याचे दिसत होते. अर्थातच सभागृहात आल्यानंतर बँक प्रशासनाने येणाऱ्या प्रत्येक अभ्यांगतांना एक भगवी टोपी व ग्रामगीता भेट दिली होती. आमसभा संपल्यानंतर ही सर्व मंडळी बँकेच्या आवारातून बाहेर पडली व आपआपल्या गावी परत जातानाही यांच्या डोक्यावर ती भगवी टोपी व हातात ग्रामगीता घेऊन जातानाचे चित्र दिसत होते. ही एकूण सर्व दृश्य सुखद तर होतीच, सोबतच शिस्तबद्ध व गुरुदेव शक्ती कार्यरत असल्याचा अनुभव देणारी होती. नुकतच जिल्हा बँकेने शेतकऱ्यांसाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण योजना सुरु केली. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या इतिहासात न भूतो... असा हा आस्थेने व गुरुदेव विचारांच्या प्रतीकांनी भरलेला प्रसंग एका वेगळ्या दिशेची चाहूल देत होता...
Comments
Post a Comment