अखेर त्या कृषी केंद्राचा परवाना निलंबित.
माढेळी: येथील एका कृषी केंद्र संचालकाने शेतकऱ्याला नगदी पावती फाडूनही युरिया खत देण्यास टाळाटाळ केल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी वरोरा यांचेकडे केलेली होती त्या तक्रारीची दखल घेऊन कृषी केंद्राची तपासणी करून अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांचेकडे पाठविण्यात आला होता त्या अनुषंगाने वरिष्ठांनी त्या कृषी केंद्राच्या परवाना एक महिन्यासाठी निलंबित केल्याचे आदेश पारित केलेला आहे.
माढेळी येथील सुनील कोहपरे या शेतकऱ्याने त्रिमूर्ती कृषी केंद्रातून जून महिन्यामध्ये युरिया खताच्या 15 बॅगची खरेदी केली होती व त्याची पावती सुद्धा कृषी केंद्र संचालकाने फाडून दिली परंतु खत साठा उपलब्ध नसल्याने युरिया खत देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे व जादा दराने खत घ्यावे लागेल असे शेतकऱ्यास सांगितल्यामुळे सुनील कोहपरे या शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी वरोरा यांचेकडे तक्रार केली केंद्र शासनाने सर्व प्रकारच्या अनुदानित खताची विक्री शेतकऱ्यांना पॉस मशीन द्वारे करणे अनिवार्य केलेले आहे शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार एम एस वरभे गुण नियंत्रण कृषी अधिकारी वरोरा यांनी 15 सप्टेंबरला कृषी केंद्राची तपासणी करून तीन दिवसात खुलासा सादर करण्याबाबत कृषी केंद्र संचालकास सांगितले त्यानुसार कृषी केंद्र संचालकाने 18 सप्टेंबरला आपला खुलासा सादर केला त्यानंतर पंचनामा अहवाल वरिष्ठाकडे पाठविण्यात आला होता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी 26 सप्टेंबरला सुनावणी घेऊन त्रिमूर्ती कृषी केंद्र संचालकास बाजू मांडण्यास सांगितले त्यानुसार कृषी केंद्र संचालकांनी आपली बाजू मांडली खत (नियंत्रण) आदेश 1985 चे खंड 35 (1)(a) व अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 च्या कलम ३(२)(i) चे उल्लंघन केल्याने सदर कृषी केंद्राचा रासायनिक खत किरकोळ विक्री परवाना 26 सप्टेंबर 2025 पासून पुढील एक महिन्यासाठी निलंबित करण्यात येत असून त्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी आदेशातून स्पष्ट केले आहे
Comments
Post a Comment