*धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा**Ø सर्वांनी समन्वयाने काम करण्याच्या जिल्हाधिका-यांच्या सुचना**Ø भोजनदान तसेच इतर कोणत्याही प्रकारचे स्टॉल रस्त्यावर नको*
*Ø सर्वांनी समन्वयाने काम करण्याच्या जिल्हाधिका-यांच्या सुचना*
*Ø भोजनदान तसेच इतर कोणत्याही प्रकारचे स्टॉल रस्त्यावर नको*
चंद्रपूर, दि. 01 : दिनांक 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथील दीक्षाभुमीवर साज-या होणा-या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 1) आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, तहसीलदार विजय पवार, महानगर पालिकेच्या प्र. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता सुहास पडोळे, यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष अशोक घोटेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, चंद्रपूर शहरात होणा-या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी तीन बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. यात गर्दीचे योग्य नियंत्रण, स्टॉल व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्था. गर्दी नियंत्रणासाठी योग्य नियोजन करावे. तसेच भोजनदान व इतर कोणतेही स्टॉल हे चांदा क्लब ग्राऊंडच्या आतमध्ये लावण्यात यावे. गाड्या तसेच बसेसची पार्किंग व्यवस्था, शहरातील पुतळ्याची स्वच्छता, दीक्षाभुमी परिसराची स्वच्छता, पाणी पुरवठा, मोबाईल टॉयलेट, वीज पुरवठा आदी कामे संबंधित विभागांनी गांभिर्याने पूर्ण करावीत.
कार्यक्रमादरम्यान या परिसरातील वीज पुरवठा खंडीत होऊ नये, तसेच रस्त्यावर किंवा झाडांवर लटकणा-या विद्युत तारांची त्वरीत तपासणी करावी. बाहेर गावावरून येणा-या बसेसच्या पार्किंगची ठिकाणे आत्ताच निश्चित करावी. रोडनिहाय पार्किंग प्लान तयार करून त्यानुसार कार्यवाही करावी. पार्किंगस्थळ दर्शविणारे फलक लावावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशासह निघणा-या रॅलीदरम्यान चोख बंदोबस्त ठेवावा. महानगर पालिकेने दीक्षाभुमी परिसरातील आजुबाजुच्या रस्त्यांची दुरुस्ती तसेच साफसफाईची कामे करावी. मोबाईल टॉयलेट, हायमास्ट लाईट, कार्यक्रमाच्या ठिकाणी अग्निशमन गाड्या उपलब्ध करून द्याव्यात.
*रस्त्यावर स्टॉल नको :* धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त विविध सामाजिक संघटनांकडून भोजनदानाचे तसेच इतर स्टॉल लावण्यात येतात. सदर स्टॉल रस्त्यावर न लावता चांदा क्लब ग्राऊंडच्या आतमध्ये लावावेत, याची सर्व सामाजिक संघटनांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
*प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन :* धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त, सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवून आपापली जबाबदरी पार पाडावी. येणा-या नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सामाजिक संघटना, नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला योग्य सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.
००००००
Comments
Post a Comment