चंदनखेडा येथे शेतमाल खरेदीचा शुभारंभ; शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याचे आमदार देवतळे यांचे आवाहन

चंदनखेडा येथे शेतमाल खरेदीचा शुभारंभ; शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याचे आमदार देवतळे यांचे आवाहन

भद्रावती – कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीच्या उपबाजार आवार चंदनखेडा येथे आज शुक्रवार, दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी शेतमाल खरेदीचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. करण संजय देवतळे यांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. रविंद्रभाऊ शिंदे होते.
या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावतीचे सभापती श्री. राजेंद्र गजानन डोंगे आणि उपसभापती सौ. अश्लेषा मं. भोयर (जीवतोडे) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कापूस पिक विक्रीसाठी बाजारात आणले आहे. या मालाला योग्य भाव देण्याचे आवाहन आमदार देवतळे यांनी व्यापारी वर्गाला केले.

 ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी शेतमाल विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणि न्याय्य भाव सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.कार्यक्रमादरम्यान शेतमाल विक्रीसाठी सर्वप्रथम सोयाबीन आणल्याबद्दल पारोधी येथील रामदास रामटेके, चंदनखेडा येथील विठ्ठल जीवतोडे आणि पारोधी येथील वामन विरुटकर या शेतकऱ्यांचा आमदार करण देवतळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि ‘ग्रामगीता’ पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

Comments