आसाळा येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना पाठवले सोयाबीन, हेक्टरी ५० हजार रुपये मदत मागितली.

असाळा येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना पाठवले सोयाबीन
  हेक्टरी ५० हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी
     सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांची मागणी

वरोरा, दि. १० : सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकांवर झालेल्या नुकसानामुळे हैराण झालेल्या आसाळा येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी एक विशेष ग्रामसभा घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. त्यानिमित्ताने शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून खराब झालेले सोयाबीन उपडून ते लिफाफ्यात भरून जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव उईके यांना स्पीड पोस्टद्वारे पाठवले. सोयाबीन पाठवून शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे.


या आधी, खांबाडा येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या संकटावर नेत्यांचे लक्ष न वेधल्याची टीका केली होती. त्यानंतर पालकमंत्री अशोकराव उईके यांनी जिल्ह्याचा दौरा जाहीर केला, परंतु शेतकऱ्यांचा आरोप आहे की पालकमंत्र्यांनी फक्त महामार्गालगतच्या शेतांच पाहणी केली, त्यामुळे गावखेड्यातील शेतकऱ्यांची व्यथा त्यांना पूर्णपणे कळली नाही. हाच नाराजीचा भाव घेऊन आसाळा येथील शेतकऱ्यांनी ही विशेष ग्रामसभा बोलावली होती.
*************
जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेल्या या ग्रामसभेत तालुक्याचे शेतकरी नेते किशोर डुकरे, प्रमोद गायकवाड, भैय्याजी गायकवाड, आशिष जांभुळे यांच्या समवेत आसाळा आणि भटाळा गावातील मोठ्या संख्येने शेतकरी व शेतकरी महिला उपस्थित होत्या. शेतकऱ्यांनी ठराविक नमुन्यादाखल पालकमंत्र्यांना सोयाबीन पाठवून शासनाकडून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पावसाने झालेल्या नुकसानीमुळे त्यांना प्रचंड आर्थिक धक्का बसला आहे, त्यासाठी शासनाने हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी.

Comments