वाघाने नागरिकांच्या दृष्टीसमोर ओढून नेला शेतकऱ्याचा बैल; सिताराम पेठेत दहशत

वाघाने नागरिकांच्या दृष्टीसमोर ओढून नेला शेतकऱ्याचा बैल; सिताराम पेठेत दहशत

वरोरा 
चेतन लूतडे 

सिताराम पेठ :  चंद्रपूर जिल्ह्यातील  मोहर्ली परिसरातील सिताराम पेठ गावामध्ये वाघांचे थैमान  सुरूच असून शेतकरी आणि नागरिक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या शुक्रवारी दुपारी एका वाघाने शेतकऱ्याचा बैल नागरिकांच्या दृष्टीसमोर ओढून नेण्याची भीतीदायक घटना घडली.

ही घटना ४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी सुमारे ४:३० वाजता सिताराम पेठ, बीट क्रमांक ९५६ येथील मोहूर्ली गेटजवळ झाली. अजब पेंदाम यांचा बैल वाघाने हल्ला करून ओढून नेला. हे दृश्य इतके भयानक होते की, ते पाहणाऱ्या नागरिकांचा थरका उडाला. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, हा वाघ 'भीमा' नावाचा असावा.
या घटनेमुळे गावकरी आणि शेतकरी समुदाय गंभीर चिंतेत बुडाले आहेत. शेतातील कामे करताना जीव मुठीत धरावा लागत आहे. शाळा-कॉलेजात जाणारे विद्यार्थी आणि इतर नागरिक सायकलने फिरताना दहशतीच्या सावटाखाली आहेत. वाघांची संख्या वाढल्यामुळे संपूर्ण समुदाय भयभीत झाला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वनविभागाचे केलेले प्रयत्न या परिस्थितीवर मात करण्यासाठी अपुरे पडत आहेत.

स्थानिकांच्या मते, 'टायगर सी-थ्री' यांचे कुटुंबातील हे सर्व वाघ असून, त्यांचे कुटुंब मोठे झाल्यामुळे या परिसरात वाघांची उपस्थिती आणि भीती नेहमीच राहते. नागरिकांच्या समोरूनच वाघांनी शेतकऱ्यांची जनावरे आणि कधीकधी माणसंसुद्धा ओढून नेण्याच्या घटना घडल्याने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. 
येथील काही वाघ इतर ठिकाणी हलवण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे.


Comments