डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती सोहळा: वैविध्यपूर्ण कार्यक्रम संपन्न

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती सोहळा: वैविध्यपूर्ण कार्यक्रम संपन्न

वरोरा, १५ ऑक्टोबर (छोटू भाई शेख) – भारतरत्न, 'मिसाईल मॅन' तथा माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर-नागपूर हायवेवरील डॉ. कलाम चौक, वरोरा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांद्वारे महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सकाळी ९ ते १० वाजता मान्यवरांच्या हस्ते फलकाला पुष्पांजली अर्पण करून व विनम्र अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
संध्याकाळी ६ वाजता चौकातील फलकाला पुन्हा पुष्पमाला अर्पण करण्यात आल्या व दीपप्रज्वलनानंतर सर्वधर्मीय सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सेवा अधिकारी लक्ष्मणराव गमे व इतर मान्यवरांनी डॉ. कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना मार्गदर्शन केले. त्यांनी डॉ. कलाम हे सर्वधर्मसमभाव, एकतेचे प्रतीक आणि देशाला शक्तिशाली बनवण्यासाठी वैज्ञानिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले. राष्ट्रपतीपदी असताना विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना सन्मान व मार्गदर्शन करणे, शासकीय मानधन न घेता स्वतःच्या खर्चाने जीवन जगणे, आपली संपत्ती ग्रामपंचायतीला लोकसेवेसाठी अर्पण करणे इत्यादी गोष्टींद्वारे त्यांचे महान व्यक्तिमत्त्व उल्लेखनीय आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमात धर्मप्रमुख, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, पत्रकार, वृत्तपत्रवाटप करणारे कामगार, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि जनसेवेतील कार्यकर्ते यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
संध्याकाळी ७ ते १० वाजेपर्यंत डॉ. कलाम तसेच इतर महापुरुष व शहीद यांच्या जीवनावर आधारित देशभक्तीपर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच, डॉ. कलाम जयंती आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून भोजन वितरण कार्यक्रमही संपन्न झाला.

या सर्व कार्यक्रमांना लक्ष्मणराव गमे, शेख जैरुदीन छोटूभाई, रुपलाल कावडे, प्रवीण खिरटकर, गजाननराव मेश्राम, अनिल झोटिंग, ढोके जी, परचाके जी, पराते गुरुजी, गोपाल गुडघे, श्री बुराण जी, मोहसीन पठाण, शब्बीर शेख, जावेद अन्सारी, महादेवराव बोडे, रहमान भाई शेख, रहमत बाबा, आत्राम जी, दशरथ शेंडे, पद्माकरराव दुधलकर, फारुक शहा, प्रशांत पिपरी, सचिन ढवस, सचिन मेश्राम, शेषराव भोयर, गुलाब धोबे, पाल सर, पंडित लोंढे, राकेश सोनवणे, खिरटकर गुरुजी, प्रवीण पाटील, विनोद गुलाब या व्यतिरिक्त इतर अनेक सहकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाउंडेशन व जयंती उत्सव समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.



Comments