*खासदार प्रतिभा धानोरकरांचा 'चक्काजाम': नागपूर-चंद्रपूर महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प**"सातबारा कोरा" घोषणेची फसवणूक; तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा*
*"सातबारा कोरा" घोषणेची फसवणूक; तातडीने ओला दुष्काळ जाहीर करा*
चंद्रपूर - अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या महायुती सरकारला जाग आणण्यासाठी आज खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने नागपूर-चंद्रपूर महामार्ग ठप्प पाडला. "ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी द्या" या प्रमुख मागणीसाठी वरोरा येथील रत्नमाला चौकात हजारो शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी 'चक्काजाम' आंदोलन केले. सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली "सातबारा कोरा" करण्याची घोषणा खोटी ठरल्याचा संतप्त आरोप करत, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट बैलबंडीने तहसील कार्यालयात जाऊन प्रशासनाला धारेवर धरले.
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सरकारवर थेट हल्ला चढवत, निवडणुकीपूर्वी भाजपानं जाहीरनाम्यात केलेली ‘सातबारा कोरा’ करण्याची घोषणा निव्वळ फसवी ठरल्याचे ठणकावले. "महाराष्ट्रातील बळीराजा संकटात आला असून कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, पण तरीही महायुती सरकार मात्र फक्त मोठमोठ्या वल्गना करून रिकाम्या आश्वासनांची फसवी नाटकं करत आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना विशेष पॅकेज देऊन कापूस उत्पादकांना हेक्टरी १ लाख, तर सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५० हजार नुकसानभरपाई शासनाने त्वरित द्यावी, अशी ठाम भूमिका या आंदोलनातून घेण्यात आली.
यावेळी चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठया संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. चंद्रपूर महामार्ग खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच शेतकरी यांनी खाली बसून अडवून धरल्यामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. मात्र रुग्णवाहिकेंना मार्ग मोकळा करून दिला जात होता. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल, तहसीलदार योगेश कोटकर, ठाणेदार तांबडे यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना आश्वासन देऊन आंदोलन संपवण्याची विनंती केली मात्र प्रशासनाने ठोस आश्वासन द्यावे याकरता त्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकर व आंदोलक हे बैलबंडीने तहसील कार्यालयात गेले आणि तहसीलदार योगेश कोटकर यांना निवेदन दिले.
या आंदोलनात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे,चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी, प्रवीण काकडे,अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सोहेलभाई रजा शेख,इंटक युवक काँग्रेस नेते प्रशांत भारती, वरोरा ग्रामीण तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, भद्रावती तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, वरोरा शहराध्यक्ष विलास टिपले, भद्रावती शहराध्यक्ष सूरज गावंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजू चिकटे, गोपाल अमृतकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विशाल बदखल, शुभम चिमूरकर, हरीश जाधव,ऐश्वर्या खामनकर, संध्या पोडे, दिपाली माटे, सरीता सूर, छोटू शेख, राजू महाजन, अनिल झोटिंग, गणेश चवले,दिलीप टिपले, लक्ष्मण बोधाले, दिनकर ठेंगणे, वसंत विधाते, गिरीधर कष्टी, प्रदीप घागी यांसह काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment