शिवसेनेचे माजी नगरसेवक दिनेश यादव यांचा आरोप न्याय न मिळाल्यास मा.उच्च न्यायालयात दाद मागण्याचा दिला इशारा
न्याय न मिळाल्यास मा.उच्च न्यायालयात दाद मागण्याचा दिला इशारा
वरोरा : वरोरा नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी दिनांक ७ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीत गंभीर तफावत असून, यावर शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक दिनेश यादव यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे अधिकृत आक्षेप सादर केला होता. त्या अनुषंगाने अति तातडीने दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडली.
दिनेश यादव यांच्या आक्षेपानुसार, काही प्रभागांत अनुसूचित जाती व जमाती आणि नामाप्र महिला आरक्षणासाठी “ईश्वर चिट्ठी” प्रक्रिया राबविण्यात आल्या, तर इतर सर्वसाधारण प्रभागांमध्ये ही प्रक्रिया न करता थेट “सर्वसाधारण महिला” आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. ही प्रक्रिया राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणुका 2025 आरक्षण आदेश यांच्या नियमांना छेद देणारी आहे.
त्याचबरोबर, प्रभाग क्रमांक ८ मध्ये सलग ४ ते ५ वेळा अनुसूचित जमातींचे आरक्षण देण्यात आले आहे. सन 2011 च्या जनगणेनुसार सन २०१६ मध्ये झालेल्या नगर परिषद निवडणुकीत पहिली निवडणूक समजण्यात यावे असे सन 2016 च्या राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार आरक्षण ठरविले गेले होते, परंतु सन 2025 ची निवडणूक ही सुद्धा सन 2011 च्याच जनगणेनुसार घेण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश असताना मग 2025 ची निवडणूक ही पहिली निवडणूक कशी समजण्यात यावी याबाबत जनतेत संभ्रमाचे वातावरण आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने अजूनपर्यंत कसलेच स्पष्टीकरण दिलेले नाही.
यामुळे विविध समाजघटकांकडून विरोध आणि आक्षेप झाले आहेत.माजी नगरसेवक दिनेश यादव यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,आरक्षण सोडतीतील तांत्रिक व कायदेशीर त्रुटी दुरुस्त कराव्यात,“सर्वसाधारण महिला”प्रभागनिहाय आरक्षण ठरवून सोडतीनुसार आरक्षण जाहीर करण्यात यावे ,तसेच प्रभाग क्रमांक २ व इतर प्रभागात ज्या एकच एक व तेच तेच आरक्षण मागील 4 ते 5 पंचवार्षिक निवडणुकीत काढण्यात आले त्यावर सुद्धा फेरविचार करून चक्रानुक्रमे नव्याने आरक्षण सोडत काढण्यात यावी.
यादव यांनी स्पष्ट केले आहे की, जर प्रशासनाने या आक्षेपावर योग्य तो निर्णय न घेतल्यास यापुढील कार्यवाहीसाठी माननीय उच्च न्यायालयात आवाहन देणारी याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. तरी ज्या ज्या प्रभागातील नागरिकांना त्यांच्या आरक्षणामुळे अन्याय झाल्याचे स्पष्ट मत असेल त्या सर्व नागरिकांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे या आरक्षण प्रक्रियेतील घोळ बाबत आवाज उठवावा असे जाहीर आवाहन शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक दिनेश यादव यांनी केले आहे.
Comments
Post a Comment